पुणे: सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने मंगळवारी पुण्यात मोठी कारवाई केली. जिल्हा परिषद माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी धाडी टाकल्या. बांदल यांच्या पुण्यातील महम्मदवाडी, शिक्रापूर आणि बुरुंजवाडी (ता.शिरूर) येथील निवासस्थानांवर ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एकाच वेळी छापे टाकले.यामध्ये बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी 5 कोटी 60 लाख रुपयांची रोकड आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे धाडसत्र बराच वेळ चालले. याशिवाय त्यांच्या बंगल्यात एक कोटी रुपये किंमत असलेले चार मनगटी घड्याळेही सापडली.
बांदल यांच्या शिक्रापूर येथील निवासस्थानी कागदपत्रांची आणि कुटुंबीयांच्या बँक लॉकरची तपासणी अधिकाऱ्यांनी केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. या छाप्यांमध्ये 5 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचेही सांगण्यात येत आहे. तर मंगलदास बांदल यांच्याकडे पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी किमतीची चार मनगटी घड्याळे ही आढळून आली आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 16 तासांहून अधिक वेळ या कारवाईसाठी खर्च केला. मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप मेळाव्याला बांदल यांनी हजेरी लावल्याने, त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. अशातच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगलदास बांदल किंवा त्यांच्या पत्नी रेखा बांदल या शिरूर-हवेलीमधून तयारी करीत असल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर बांदल यांच्यावर ‘ईडी’ची छापेमारी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहेजिल्हा परिषदेचे माजी सभापती मंदलदास बांदल हे आत्तापर्यंत चारवेळा ईडीसमोर हजर झाले होते. मात्र तरीही मंगळवारी ईडीने त्यांच्या दोन्ही बंगल्यावर छापा टाकला. मंगलदास बांदल हे पुण्यातील महंमदवाडी भागातील त्यांच्या घरी होते. अत्यंत गोपनीय पद्धतीने ईडीने सकाळी साडेसहाच्या सुमारास हा छापा टाकला. त्यावेळी ईडीने सुमारे दोन कि.मी. पर्यंतचा परिसर सील केला. कोणालाही घरात जाण्यास व बाहेर येण्यास परवानगी नव्हती. त्याचवेळी शिक्रापूरमध्ये असलेल्या घरीही ईडीने छापा टाकला. या दोन्ही कारवाया अगदी एकाच वेळी करण्यात आल्या.
बांदल हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणूकप्रकरणी सध्या जामीनावर बाहेर आहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात यापूर्वी बांदल यांना ईडीने एक वर्षभरापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. चौकशीसाठी ते चार वेळा ईडीच्या पुणे कार्यालयात हजरही राहिले होते. चौकशीला चांगले सहकार्य करीत होते. याशिवाय तीन वर्षांपूर्वी प्राप्तीकर विभागाकडून बांदल यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यामध्ये मोठी रक्कम आणि महागड्या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.