पुणे : विवाहित असतानाही लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध केले. तिच्याशी साक्षगंध केला. कार्यालयांमध्ये तिची पत्नी म्हणून ओळख करुन दिली. असे असताना एके दिवशी तिला समजते की त्याला दोन मुली असून त्याची पत्नीही आता गर्भवती आहे. लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीकडून १० लाख रुपये घेऊन फसवणुकीचा प्रकार नुकताच समोर आला होता. फसवणुक झाल्याने मानसिक धक्का बसून डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली होती. हा प्रकार ताजा असतानाच आणखी एका तरुणीची फसवणुक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ३२ वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी औरंगाबाद येथील एका ४० वर्षाच्या नराधमावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एप्रिल २०१९ ते १६ जानेवारी २०२४ दरम्यान घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा खासगी नोकरी करतो. २०१९ मध्ये निवडणुकीच्या कामानिमित्त त्यांची ओळख झाली होती. या ओळखीतून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात मैत्रीत झाले. आरोपीने फिर्यादी यांना कामाला लावतो, असे म्हणून फिर्यादी यांना बोलावून घेतले. फिर्यादीस तु मला आवडतेस, मला तुझ्यासोबर लग्न करायला आवडेल, तु माझ्याशी लग्न करशील का म्हणून विचारले. फिर्यादी यांनी त्यांचे आईवडिलांना विचारुन आरोपीला लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीस हॉटेलमध्ये घेऊन जाऊन फिर्यादीसोबत जबरदस्ती शारीरीक संबंध केले. तसेच फिर्यादीचे घरी जाऊन आईवडिलांशी लग्नाची बोलणी केली.
फिर्यादी सोबत साक्षगंध केले आहे. तसेच फिर्यादी यांना विविध कार्यालये येथे पत्नी म्हणून ओळख करवून दिली. फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारपूस केली असता फिर्यादीला मारहाण केली आहे. फिर्यादी यांनी ही बाब आरोपीच्या भावाला सांगितली. तेव्हा त्याच्या भावाने आरोपी हा विवाहित असून त्यास दोन मुली आहे. त्याची पत्नी गर्भवती आहे, असे सांगितले. याबाबत तिने आरोपीकडे विचारणा केल्यावर त्याने माझे लग्न झाले म्हणून काय झाले मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे म्हणून तुला जीवे मारुन टाकीन, अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करीत आहेत.