आम्ही इथले भाई आहोत, आमच्याबरोबर गुन्हे करायचा, आता आमच्या सोबत का राहत नाही ?

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे / पिंपरी : या आधी आमचे बरोबर रहायचा, फिरायचा, आमचे सोबत गुन्हे करायचा, आता आमचे सोबत का राहत नाही, असे विचारल्यावर त्याने मी सर्व सोडून दिले आहे. कामधंदा करत असे सांगितल्यावर तिघांनी आम्ही इथले भाई आहे, तु आमच्यासोबत राहत नाही, तुला आता दाखवतोच असे म्हणून हातातील बिअर बाटली फोडून या तरुणाच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत साहिल रमेश शिंदे (वय १९, रा. महात्मा फुलेनगर, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अतुल अर्जुन तांबे (रा. आगरकरवाडी, चाकण), विजय पवार (रा. वाघेवस्ती, चाकण) आणि ओमकार मनोज बिसनारे (रा. चाकण नगर परिषदेजवळ, चाकण) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चाकणमधील मच्छी मार्केटमध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फ्लेक्स लावण्याचे काम करतात. शुक्रवारी सायंकाळी ते मच्छी मार्केट येथे मित्र वैभव शिंदे याच्यासह गप्पा मारत उभे होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे अतुल तांबे, विजय पवार, ओमकार बिसनारे दुचाकीवर तेथे आले. अतुल याच्या हातात बिअरची बाटली होती. अतुल साहिल याला म्हणाला, तू याआधी आमचे बरोबर रहायचा, फिरायचा, आमचे सोबत गुन्हे करायचा, आता आमचे सोबत का राहत नाही़ असे विचारले. त्यावर साहिल म्हणाला की, मी हे सर्व सोडुन दिले आहे़ व कामधंदा करत आहे, असे सांगितले. अतुल म्हणाला, आम्ही इथले भाई आहे. तु आमचे सोबत राहत नाही, तुला आता दाखवतोच, असे बोलून अतुल याने हातातील बिअरची बाटली साहिल याच्या डोक्यात मारली. त्यांच्याबरोबर एका मुलाने तेथे पडलेला दगड उचलून पाठीत मारला. त्यांचा मित्र नवनाथ याच्या गाडीवर मारला. त्या तिघांनी साहिल यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे पाहून त्याचे मित्र पळून गेले. मच्छी मार्केटमधील दुकानदारांनी दुकाने बंद केली. साहिल याची आई त्याला वाचवायला पुढे आली. त्यानंतर ते टोळके पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags