पुणे : वारसदार नोंदीसाठी महिलेने २ हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली गेली. तपासणीत बिगारी सेवक म्हणून नियुक्ती असताना त्या पदवीधर असल्याने त्यांना लिपिकाचे नाव दिल्याचे दिसून आले.छाया यशवंत जातेंगावकर (कुकडे) (वय ५७) असे या महिलेचे नाव आहे. त्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील कर आकारणी विभागात कार्यरत आहेत. याबाबत एका ४६ वर्षाच्या नागरिकाने तक्रार दिली होती़ तक्रारदार यांचे वडिलांचे ७ जुलै २०१२ मध्ये निधन झाले. त्यांचे राहते घराच्या मालमत्तेवर कर संकलन विभाग येथे वारसदार नोंदणी करण्यासाठी ते छाया जातेंगावकर यांना भेटले. जातेंगावकर हे बिगारी सेवक म्हणून त्या नोकरी करत असल्या तरी त्यांचे शिक्षण बी कॉम आहे. त्यामुळे त्यांना कार्यालयात लिपिकाचे काम दिले आहे. त्यांच्या हाताखाली २ कंत्राटी नोकर आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयाची लाच मागितली. २४ जानेवारी रोजी ही तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानंतर २७ जानेवारी रोजी त्याची पडताळणी केली गेली. त्यात तडजोडीअंती शासकीय फी व्यतिरिक्त १ हजार रुपयांची लाचेची मागणी करुन ती स्वीकारण्याची तयार दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा कारवाई झाली नाही. परंतु, लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने या महिलेवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक विजय पवार तपास करीत आहेत.
