सातारा: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ( Pune Porsche Accident ) रोज नवीन खुलासे होत आहे. अशातच आता अल्पवयीन मुलाच्या बापाला मोठा धक्का बसला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने महाबळेश्वर येथील विशाल अग्रवाल याच्या MPG क्लब मधील बार सील केला आहे.
हा बार अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अग्रवाल कुटुंबीयांना मोठा धक्का मानला जात आहे.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल हे दोघेही सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. या प्रकरणानंतर अग्रवाल कुटुंबीयांचे अनेक कारनामे समोर आले. यातच महाबळेश्वरमध्ये सुरेद्रकुमार अग्रवाल यांच्या नावाने महाबळेश्वर पारसी जिमखान्यामध्ये क्लब आणि रिसॉर्ट आहे. या क्लबबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने चौकशी केली. यावेळी अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. त्यानंतर सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं MPG क्लबचा बार अखेर सील करण्यात आला आहे. अग्रवाल याचं अनाधिकृत हॉटेल असल्याच्या तक्रारीनंतर हा बार सील करण्यात आला आहे.
लेकराला वाचवण्यासाठी दिले रक्ताचे नमुने, आईला अटक होणार?
दरम्यान, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. यात दोन डॉक्टरांना अटकही करण्यात आलीय. अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून त्याच्या जागी आईच्या रक्ताचे नमुने घेतल्याची माहिती समोर आलीय. सुरुवातीला डॉक्टर श्रीहरी हरनोळ याने योग्य नमुने घेतले होते. मात्र फोन करून काहींनी दबाव टाकल्यानं रक्ताचे नमुने (Blood Samples) बदलले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अपघातानंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) नेलं होतं. तिथं डॉक्टर श्रीहरी हरनोळने रक्ताचे योग्य नमुने घेतले होते. मात्र त्यानंतर रुग्णालयात आलेल्या दोन व्यक्तींकडून दबाव टाकला गेला. त्यामुळे हरनोळ याने सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन तीन रक्ताचे नमुने घेतले. यामध्ये एक नमुना अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांचे होते. आता या प्रकरणी पुणे पोलीस शिवानी अग्रवाल यांचा शोध घेत आहेत.
पुणे ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने हेराफेरी करणाऱ्या डॉक्टरांना लाखो रुपये पुरवणाऱ्य मकानदार नामक व्यक्तीचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. मकानदार यांनी मोठी आर्थिक रक्कम ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टर अजय तावरे याला दिली असल्याची माहिती समजते. ब्लड सॅम्पल प्रकरणात विशाल अग्रवाल याच्याकडून मकानदारने रक्कम डॉक्टर तावरे यांच्याकडे सुपूर्द केली. मकानदार पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ब्लड सॅम्पल हेराफेरी प्रकरणी मोटा उलगडा होण्याची शक्यता आहे. अजय तावरे याला दिलेल्या मोठ्या आर्थिक रकमेची मिळणार माहिती त्याच्याकडून मिळेल.









