पुणे :आय टी इंजिनिअरला भर चौकात मारहाण केल्याच्या प्रकरणात कोथरुड पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीची किरकोळ कलमे लावली होती. गजा मारणेच्या गुंडांनी (Gaja Marne Gang) मारहाण केल्याचे व कोथरुड पोलीस (Kothrud Police) त्याची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चक्रे फिरली आणि कोथरुड पोलिसांनी गजा मारणे टोळीतील या गुंडांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम वाढविले आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. वानखेडे यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे ओम तिर्थराम धर्मजिज्ञासू Om Tirtharam Dharmajigyasu (वय ३५,रा. शिंदे चाळ, शास्त्रीनगर, कोथरुड), किरण कोंडिबा पडवळ Kiran Kondiba Padwal (वय ३१, रा. शेख चाळ, शास्त्रीनगर, कोथरुड), अमोल विनायक तापकीर Amol Vinayak Tapkir (वय ३५, रा. लालाबहादूर शास्त्री कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार कोथरुडमधील भेलकेनगर चौकात १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला होता. पोलिसांनी या तिघांना २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता अटक केली. त्यांचा चौथा साथीदार बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार (Babya Alias Shrikant Sambhaji Pawar हा फरार आहे. फरार बाब्या पवार याच्याविरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी असे कोथरुड, भारती विद्यापीठ, पौड, अलंकार पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत.
https://www.instagram.com/reel/DGVc0t0pD9M/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
त्यापैकी ४ गुन्ह्यामध्ये त्याची निर्दोष सुटका झाली आहे. अमोल तापकीर याच्याविरुद्ध कोथरुड, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोड्याच्या तयारीत, मारामारी असे ६ गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.
किरण पडवळ याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म अॅक्ट खाली ४ गुन्हे दाखल आहेत. ओम धर्मजिज्ञासू याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण करुन खंडणी मागणे, मारामारी असे चार गुन्हे दाखल असून त्यातील एका गुन्ह्यात निर्दोष सुटका झाली आहे.
याबाबत जोग (कोथरुड) यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. जोग हे आयटी कंपनीत नोकरीला आहेत. ते दुचाकीवरुन जात असताना रस्त्यावर लोकांची गर्दी असल्याने ते थांबले होते. त्यावेळी पांढरा शर्ट घातलेला एक जण त्यांना म्हणाला की, काय रे गाडी हळु चालविता येत नाही़ धक्का मारतो का. त्यावर ते म्हणाले, दादा मी तुम्हाला धक्का दिला नाही, असे बोलत असताच त्यांच्यातील दुसरा पिवळा शर्ट परिधान केलेल्याने त्यांच्या कानाखाली व तोडांवर बुक्का मारला. त्यामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे दुचाकीवरुन खाली पडल्याने खरचटले. त्यानंतर ३ ते ४ जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ते मारहाण करीत असतानाच एकाने कमरेचा पट्टा काढून मारहाण केल्याने त्यांना मुका मार लागला. त्यानंतर मारहाण करणारे गुजराथ कॉलनीच्या दिशेने दुचाकीवरुन पळून गेले.
पोलिसांनी आज तिघांना न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे समाजामध्ये दहशत असल्याने त्यांच्याविरुद्ध साक्षीदार होण्यास अगर तक्रार देण्यास नागरिक समोर येत नसल्यामुळे या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपी पोलीस कोठडी रिमांडमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे.
फिर्यादी यांच्या जिवितास धोका उत्पन्न होईल, अशा पद्धतीने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कृती केली आहे, तरी आरोपींनी जीवे ठार मारण्याची कृती ही नेमके कोणत्या कारणासाठी केली आहे, याबाबत प्रत्यक्षात आरोपींना विश्वासात घेऊन तपास करणे आवश्यक आहे. गुन्हा करण्याकरीता आरोपींना कोणी चिथवणी दिली आहे अगर कसे तसेच या गुन्ह्यात इतर कोणाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग आहे का याबाबत आरोपींकडे तपास करायचा आहे.
यातील फरार आरोपी बाब्या पवार याचा ठावठिकाणाबाबत अटक आरोपीकडे चौकशी करुन त्याला अटक करायची आहे. फिर्यादी यांना मारहाण केलेले हत्यार (कमरेचा पट्टा) जप्त करायचा आहे. मोटारसायकली जप्त करायचे आहे. गुन्ह्याचे तपास पुरावे कामी रक्त नमुने काढून घेणे बाकी आहे, गुन्हा करताना परिधान केलेले कपडे जप्त करायचे आहे. या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करायचा असे पोलिसांनी सांगितले.
आरोपींच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, सुरवातीला किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल असताना जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल होणार असतील तर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. त्यानंतर न्यायालयाने तिघांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.