राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर शहरात एका मग्रूर वाहनचालकाने वाहतूक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “मला ओळखत नाही का? तुम्हाला सगळ्यांना दोन तासांत ‘सस्पेंड’ करतो!” असे म्हणत या ‘VIP’ गाडीचालकाने पोलिसांशी अरेरावीने हुज्जत घातली. आलिशान गाडीतून खाली उतरण्यास सांगितल्याचा राग अनावर झालेल्या या चालकाने पोलिसांनाच दमदाटी करण्यास सुरुवात केली.
भर रस्त्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. कुणाल बाकलीवाल असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात सुसाट वेगात वाहने चालवणाऱ्यांची संख्या कमी नाही. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून, सिग्नल तोडून, सायरन वाजवत अनेक जण सर्रास फिरताना दिसतात. मात्र, या घटनेने सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत.
‘VIP’ माज आणि पोलिसांना धमकी
शहरात सुसाट वेगात, व्हीआयपी सायरन (VIP Siren) वाजवत जाणाऱ्या एका आलिशान कारला वाहतूक पोलिसांनी थांबवले. गाडीतून खाली उतरण्यास सांगितल्यावर या कारचालकाने थेट बड्या व्यक्तीला फोन लावला आणि “साहेब, हे मला गाडीतून खाली उतरायला सांगत आहेत,” अशी तक्रार केली. त्यानंतर त्याने पोलिसांनाच “तुम्हाला ड्युटी (Duty) करता येत नाही, गप्प बस, माझ्या नादी लागू नको,” असे धमकावण्यास सुरुवात केली.
“तुम्ही पोलीस (Police) असाल तर काय माझे बाप झालात की देव झालात?” अशी भाषा वापरत त्याने पोलिसांना शिवीगाळ केली. विशेष म्हणजे, या घटनेचे रेकॉर्डिंग सुरू असल्याचे लक्षात येऊनही तो थांबला नाही. “जनतेच्या पैशातून यांना पगार भेटतो आणि हे जनतेलाच असे वागवतात,” असे म्हणत त्याने मीडियाला बोलावण्याची धमकी दिली.
कायदेशीर कारवाई
या घटनेनंतर अखेर पोलिसांनी या मग्रूर चालकाला गाडीतून खाली उतरण्यास भाग पाडले. त्याच्या या कृत्याबद्दल त्याच्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या घटनेने ‘आपलंच राज्य’ अशा आर्विभावात वावरणाऱ्या आणि ‘पोलीस’ या पदाला कवडीमोल समजणाऱ्या धनाढ्य व्यक्तींच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.