पुण्यातील कल्याणीनगरमध्ये मे महिन्यात झालेल्या पोर्श अपघाताच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत बाईकस्वारांना चिरलडलं, त्यात दोघांचा मृत्यू झाला.याप्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले, त्याचा निकाल अजूनही लागलेला नाही, पण या घटनेवरून पोलीसांनी काहीच धडा घेतलेला दिसत नाही. कारण पुण्यापासून अवघ्या काहीच अंतरावर असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये असाच काहीसा अपघात झाला, त्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला तरीही पोलिस ढिम्मच आहेत. हा अपघात इतका गंभीर नाही असं त्यांचं म्हणणं असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
पिंपरी चिंचवडच्या सोसायटीत कारने बाळासह मावशीला उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये तो कैदही झाला. या घटनेमध्ये त्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तर त्याच्या मावशीला सुद्धा चांगलाच मार लागला आहे. मोशीच्या प्रिस्टीन ग्रीन सोसायटीत हा अपघात 16 जानेवारी रोजी झाला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल नाही. या अपघाताचे संपूर्ण दृश्य सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. ती दृश्यं पाहिल्यावर यात कार चालकाची चूक आहे, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची नक्कीच गरज नाही.
मात्र जखमी मुलाच्या वडिलांनी यात माझ्याच मुलाची चूक आहे, तोच गाडीच्या समोर धावत आला, असं त्यांनी पोलिसांना लिहून दिलं असून त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. कदाचित मुलाच्या वडिलांवर दबाव आला असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. पण या घटनेते तो लहा मुलगा आण त्याची मावशी दोघेही गंभीर जखमी झालेत, अपघाताचे दृश्य समोर दिसत असूनही पोलिसांना हा अपघात गंभीर वाटू नये, ही खरी शोकांतिका आहे. पोलिसांनी सुमोटो कारवाई का केली नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पुण्यातील पोर्षे कार अपघातातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही धडा घेतला नसल्याचं यातून पुन्हा एकदा दिसून येतंय.सोसायटीच्या गेटमधून एक कार आत येते, तर एक लहान मुलगा आणि त्याची मावशी बाहेरच्या दिशेने जात असतात. मात्र आत आलेली ती कार अचानक वळली आणि समोरून चालत येणाऱ्या दोघांना जाऊन धडकली, त्यांना चाकाखाली अक्षरश: चिरडलं. ही घटना पाहून एकच कल्लोळ माजला,आजूबाजूच्या लोकांनी लगेचच त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल न झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.