पुणे – दारुवाला पुल चौकाजवळील नागझरीत संशयास्पदरित्या फिरणार्या एका १७ वर्षाच्या मुलाकडून समर्थ पोलिसांनी पिस्टल व काडतुस हस्तगत केले आहे.
याबाबत पोलीस अंमलदार शरद घोरपडे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना रविवारी रात्री साडआठ वाजता पोलीस हवालदार इम्रान शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक फडतरे यांना कळविले की, त्यांना त्यांच्या बातमीदाराकडून खबर मिळाली की, दारुवाला चौक येथील नागझरी नाल्याजवळ एक काळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला मुलगा संशयास्पदरित्या फिरत असून त्यांच्याकडे शस्त्र आहे. याबातमीनुसार पोलिसांनी टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाचे पाठीमागे थांबलेल्या मुलाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपयांचे एक सिल्व्हर रंगाचे मॅग्झीन असलेला गावठी कट्टा व १ हजार रुपयांचे दोन जिवंत काडतुसे मिळून आले.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार रोहिदास वाघेरे, इम्रान शेख, रहिम शेख, अमोल गावडे, शिवा कांबळे, कल्याण बोराडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.
