पुणे : नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी गाड्या टोइंग टेम्पोमार्फत उचलण्याची कारवाई करत असताना दोन महिलांनी वाहतूक पोलीस हवालदाराला शिवीगाळ करुन चप्पलेने मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बालिका सूर्यवंशी व संगीता लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील गाडीतळ येथे घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हडपसर वाहतूक शाखेत नेमणूकीला आहेत़ टोइंग टेम्पो घेऊन ते नो पार्किंगमधील दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर असणार्या नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई करत होते. त्यांच्या आदेशाने टेम्पो कर्मचारी एक ज्युपिटर गाडी उचलत असताना दोन महिला तेथे आल्या. त्यांनी शिवीगाळ करुन चप्पलने मारहाण केली. फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना बालिका सूर्यवंशी हिने फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली. कायदेशीर काम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी फिर्यादीला दमदाटी केली. पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख तपास करीत आहेत.