पुणे : पूर्वी झालेली भांडणे मिटल्याचे सांगितल्यानंतरही चौघा जणाच्या टोळक्याने महाविद्यालयीन तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत अथर्व संतोष जाधव (वय १८, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कार्तिक गुमाने (वय २३), अक्षय गागडे (वय २४), गणेश जाधव (वय २४), वैभव थोरात (वय २२, सर्व रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना केशवनगर येथील बीडकर यांच्या गोठ्याचे मागे ६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अथर्व जाधव हा ११ वीचे शिक्षण घेत आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याचे कार्तिक गुमाने याच्याबरोबर किरकोळ वाद झाला होता. परंतु तेव्हा त्यांच्यातील वाद आप आपसात मिटला होता. अथर्व जाधव हा ६ फेब्रुवारी रोजी रात्री त्याचा मित्र तेजस सकट याच्याकडे गेला. तेव्हा त्याने माझे गायरान वस्तीमध्ये वैयक्तिक काम आहे, असे सांगून त्याच्या गाडीवरुन तो अथर्वला येथे गायरान वस्ती येथे घेऊन गेला. बीडकर गोठ्यामागे गाडी पार्क केली. तेव्हा त्यांच्या समोर कार्तिक गुमाने, अक्षय गागडे, गणेश जाधव,वैभव थोरात उभे होते. कार्तिक हा अथर्वला म्हणाला, ”अथर्व याने यापूर्वी आपल्याबरोबर भांडणे केली आहेत. त्याला माहिती नाही, आपण कोण आहोत. याला आज दाखवून देऊ.
आपण कोण आहोत, याला जिवंत सोडायचे नाही,” असे म्हणून सर्व जण अथर्वजवळ आले. तेव्हा त्याने कार्तिक याला ”आपल्यातील भांडणे मिटली आहेत,” असे म्हणाला. त्यावर कार्तिक गुमाने याने त्यांच्या कमरेला लावलेले धारदार हत्यार काढून अथर्वच्या डोक्यात वार केला. डोक्यातून रक्तस्त्राव होऊन तो खाली पडला. तेव्हा इतरांनी लाकडी दांडक्याने अथर्वच्या हातावर, पाठीवर, डोक्यात जोरजोरात मारहाण केली. वैभव थोरात याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेजस सकट हा सोडविण्यासाठी मध्ये पडला. तेव्हा त्यालाही मारहाण केली गेली. त्यांचा आवाज ऐकून लोक जमा झाले होते. तेव्हा कार्तिक गुमाने, अक्षय गागडे, गणेश जाधव, वैभव थोरात यांनी हातातील शस्त्रे, लाकडी दांडके हवेत फिरवून ”आमच्याशी पंगा घेतला तर अशीच अवस्था होईल, इथून पुढे कोणी आमच्या नादाला लागायचे नाही,” तेजस सकट व आदित्य गायकवाड यांनी अथर्व जाधव याला सोडवून मुंढवा पोलीस ठाण्यात नेले. तेथून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सहायक पोलीस निरीक्षक संजय माळी तपास करीत आहेत.