पूर्ववैमनस्यातून सपासप वार करत तरुणाची निर्घृण हत्या, ‘साहेब मी खुन केलाय’ आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात हजर, घटनेने परिसरात खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp

सातारा : पूर्ववैमनस्यातून तलवारीने सपासप वार करत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अमर शांताराम कोंढाळकर (वय-२२ रा वडवाडी ता. खंडाळा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर तेजस महेंद्र निगडे (वय-१९ रा. गुणंद ता. भोर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ही घटना शिरवळ एमआयडीत (दि.१२) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे. (Murder Case)

मिळालेल्या माहितीनुसार, अमर व तेजस एकाच कंपनीत नोकरीला होते. दरम्यान काही दिवसापूर्वी या दोघात किरकोळ भांडणे झाली होती. याचा राग तेजस निगडे याने मनात धरत बुधवारी (दि.१२) रात्री कंपनीतून अमर बाहेर येण्याची वाट बघत बसला होता. यावेळी त्याने पोत्यात तलवार लपवुन ठेवली होती. यावेळी अमर व त्याचा मित्र दुचाकीवरून बाहेर आल्यानंतर तेजसने त्याला अडवुन एक कानशिलात लगावली. यावेळी मित्र त्याठिकाणावरून पसार झाला. मात्र अमर तेथेच थांबला. दरम्यान तेजस ने तलवारीने डोक्यावर, हातावर व पायावर सपासप वार केले. यावेळी रक्तबंबाळ अवस्थेतील अमर कोंढाळकरचा जागेवरच मृत्यू झाला.

त्यानंतर संशयित आरोपी तेजस निगडे याने एका दुचाकीस्वाराची लिफ्ट घेऊन घटनास्थळावरून थेट शिरवळ पोलीस स्टेशन गाठले. साहेब मी खुन केला आहे असे म्हणत तो पोलिसात हजर झाला. दरम्यान डीवायएसपी राहुल धस, शिरवळ पोलिस निरीक्षक संदिप जगताप व उपनिरीक्षक नयना कामठे व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags