एकाला धडा शिकविण्यासाठी 5 जणांच्या वाहनांची तोडफोड; फरासखाना पोलिसांनी केली 6 जणांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे :बिबवेवाडी येथे झालेल्या वाहनांच्या तोडफोडीच्या घटनेनंतर येरवडा आणि फरासखाना येथे गुरुवारी पहाटे वाहनांच्या तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. चार दिवसांपूर्वी एकाला मारहाण झाल्याने त्याला धडा शिकविण्यासाठी टोळक्याने त्याच्या गाडीसह एक रिक्षा आणि ४ दुचाकीची तोडफोड करणारी घटना कागदीपुरा येथे घडली. याबाबत पोलिसांनी सराईत गुन्हेगारांसह ६ जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत यासीन इम्तीयाज शेख (वय २९, रा. कागदीपुरा, कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मयुर गणेश अडागळे (वय १८, रा. पीएमसी कॉलनी, कसबा पेठ), मंथन प्रकाश सकट (वय १९, रा. पीएमसी कॉलनी), आयान अख्तर शेख (वय २०, रा. ओम देविदास शिंदे (वय २०, रा. मंगळवार पेठ), आर्यन संदीप वाघमारे (वय २०, रा. पीएमसी कॉलनी, कसबा पेठ), साहील कुरेशी (वय २१)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मयुर अडागळे याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गर्दी जमवून दहशत माजविणे, मारहाण केल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. आयान शेख याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल आहे. साहील कुरेशी याच्याविरुद्ध पळवून नेणे, पोक्सो, तसेच खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी याखाली फरासखाना, समर्थ, खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यासीन शेख हे रिक्षाचालक आहेत. ते घरात झोपले असताना तीन मोटारसायकलवरुन आरोपी आले. त्यांनी त्यांची रिक्षा व इतर ५ मोटारसायकलवर कोयते मारुन त्यांची तोडफोड केली. आणि ते पळून गेले. पोलीस नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर फरासखाना पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी सराईत गुन्हेगार मयुर अडागळे याला पकडून आणले. त्याने सांगितले की, चार दिवसांपूर्वी आयान शेख याला कसबा पेठेतील पीएमसी बिल्डिंगसमोर जाहीद ताजुउद्दीन कुरेशी व इतरांनी वाद घालून मारहाण केली होती. त्याची तक्रार पोलिसांकडे दिली नव्हती. जाहीद कुरेशी व इतरांना धडा शिकविण्यासाठी आम्ही तीघे मोटारसायकलवरुन येऊन कोयत्याने, दगडाने गाड्यांची तोडफोड केली.

जाहीद कुरेशी याला धडा शिकविण्यासाठी फिर्यादीची रिक्षा, जमील कुरेशी यांची यामाहा मोटारसायकल, ताजुद्दीन कुरेशी याची जावा मोटारसायकल, इम्रान कुरेशी यांची होंडा अ‍ॅक्टीव्हा, अकीब कुरेशी यांची होंडा अ‍ॅक्टीव्हा यांच्यावर हातातील कोयते व दगड मारुन गाड्यांचे नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags