पुणे : दीड लाख रुपये देताना जमिनीची कागदपत्रे गहाण ठेवली होती. पैसे परत न करता कागदपत्रे देण्यास नकार दिल्याने एकाने महिलेच्या डोक्यात चाकूने वार करुन तिला गंभीर जखमी केले. महिलेच्या बहिणीवरही चाकूने मारहाण करण्याचा प्रकार हडपसरमध्ये समोर आला आहे. याबाबत सत्यभामा फुलचंद सास्तुरे (वय ३०, रा. शेवाळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दत्तात्रय भोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शेवाळवाडी येथील गल्लीत बुधवारी दुपारी तीन वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची दत्तात्रय भोरे याच्याबरोबर एक वर्षापूर्वी ओळख झालेली होती. त्यानंतर ते चांगले मित्र झाले होते. त्यांची अडचण असल्याने फिर्यादी यांनी त्याला साधारण १० महिन्यांपूर्वी हात उसने म्हणून दीड लाख रुपये दिले होते. त्याचे बदल्यात त्याची कुंजीरवाडी येथील २ गुंठे जागेची कागदपत्रे फिर्यादी यांनी स्वत:जवळ ठेवून घेतली आहेत. तो रक्कम परत करत नसल्यामुळे त्यांच्यात वादविवाद झाले होते.
१२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता भोरे हा फिर्यादी यांच्या घरात आले. जागेची कागदपत्रे मागु लागला. तेव्हा फिर्यादी त्यास माझे पैसे दे, असे म्हणू लागले. तेव्हा त्याने तुझे पैसे मी देत नाही़ तुला काय करायचे आहे ते कर, असे म्हणु लागला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला तू जोपर्यंत माझे पैसे देत नाहीस, तोपर्यंत मी तुला जागेचे कागदपत्रे देणार नाही, असे सांगितले. त्यावर त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करीत मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्यापासून सोडविण्यास त्यांची बहिण गोदावरी आली. ती भोरे याला फिर्यादीपासून दूर ढकलु लागली. तेव्हा त्याने खिशातून चाकु बाहेर काढला व त्याने चाकुने फिर्यादीच्या डोक्यात वार केले. डोक्यातून रक्त येऊ लागल्यामुळे त्या खाली पडल्या. हे पाहून गोदावरी जोर जोराने ओरडु लागली असता त्याने तिच्या डोळ्याचे खाली चाकुने वार केला व तो पळून गेला. पोलीस हवालदार टेंगले तपास करीत आहेत.