ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहित करुन महिलेने तिला घरामध्ये डांबून ठेवले. बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर दोघांनी सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अत्याचाराचे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.याबाबत एका ३२ वर्षाच्या पीडिताने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ३० वर्षाच्या महिलेसह ५५ आणि ३० वर्षाच्या पुरुषांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. ही घटना एप्रिल २०२४ ते २ जानेवारी २०२५ दरम्यान घडली आहे़
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे लव्ह इनमध्ये राहतात़ फिर्यादी यांच्याबरोबरील महिलेने तिला ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहित केले. मात्र, तिला ख्रिश्चन धर्मात घेतले नाही. तिला घरामध्ये डांबून ठेवले़ बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली़ इतर दोघा पुरुषांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला़ त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला़ हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर ३० वर्षाच्या पुरुषाने फिर्यादीला त्याच्या घरी वारंवार बलात्कार केला. तिघांनी फिर्यादीच्या घरातील देवघरातील देवांच्या प्रतिमेची तोडफोड केली आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे तपास करीत आहेत.