गुन्हेगारी रील्स बनवून सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे : गुन्हेगारीचे उदात्तीकरण करुन समाजामध्ये भिती व दहशत पसरविणारे व्हिडिओ रिल्सची माहिती काढून रेकॉर्डवरील गुन्हेगार गजानन मारणे याच्या नावाने व्हिडिओ रिल्स, फोटो प्रसारित करणार्‍या चौघांना गुन्हे शाखेने पकडले आहे. गजानन मारणे याच्या नावाने तब्बल १३ इंस्टाग्राम अकाऊंट अ‍ॅक्टीव्हेट असल्याचे दिसून आले आहे. अक्षय निवृत्ती शिंदे (वय २०, रा. निमगाव खालु, ता. श्रीगोंदा, जि़. अहिल्यानगर), सिद्धार्थ विवेकानंद जाधव (वय १९, रा. महमंदवाडी,हडपसर), साहिल शादुल शेख (वय १९, रा. सुंबा, धाराशिव) आणि इरफान हसन शेख (वय १९, रा. सुंबा, धाराशिव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना माहिती काढण्याबाबत सांगितले होते. त्यात इंस्टाग्राम अकाऊंटमध्ये किंग ऑफ पुणे सिटी मा. श्री गजानन महाराज मारणे, पुण्यातील गुन्हेगारीची मुंबईच्या टोळ्यांशी हातमिळवणी, किंग ऑफ महाराष्ट्र, पुण्याचा बाप कोण आहे, अख्या पुण्याला माहिती आहे, या नावाने व्हिडिओ रिल्स, यहा का मै हु किंंग और मेरे चलते है रुल्स और उन रुल्स को अपने हिसाब से बदलता रहता हू, तो उने चुपचाप फॉलो करो, अगर इसके अलवा और कुछ करने की कोशिश की, तो तेरे टुकडे टुकडे करके ताश की तरह फैला दुंगा, तसेच किंग ऑफ पुणे सिटी, जस मुंबईत एकच दादर तसच पुण्यात एकच फादर, ड्रोन कॅमेराचा वापर करुन गज्या मारणेच्या गाडीचा ताफा, फोटो वापरुन गुन्हेगारीचे उदात्ताीकरण करुन समाजामध्ये भिती व दहशत पसरविणे अशा प्रकारचे व्हिडिओ रिल्स, फोटो प्रसारित केलेले आहेत.

या १३ इंस्टाग्राम अकाऊंट धारकांच्या विरोधात पोलीस अंमलदार प्रशांत शिंदे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचे रिल्स बनवुन सोशल मीडियावर टाकणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई सुरु राहणार आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार सैदोबा भोजराव, प्रशांत शिंदे, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, अमोल धावटे, चेतन आपटे, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, चेतन चव्हाण, संग्राम शिनगारे, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags