पुणे – शिवजंयतीनिमित्त सिंहगडावरुन ज्योत आणण्याकरीता कोल फायर उडवत जात असताना ते रस्त्याच्या कडेला थांबलेल्या गुंडाच्या अंगावर पडले. त्यावरुन टोळक्याने तरुणाला गाठून लाकडी बांबुने बेदम मारहाण केली.या घटनेची माहिती मिळाल्यावर जाब विचारल्याने या गुंडांनी तरुणाच्या वडिलांनाही मारहाण केली.याबाबत तेजस अंकुश राजे (वय २२, रा. कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय दिल्लीवाला, ओमकार निम्हण (दोघे रा. कर्वेनगर) व त्यांच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय दिल्लीवाला याच्यावर पूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत. हा प्रकार कर्वेनगर येथील विकास चौकात १७ मार्च रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कॉलनीतील मित्रांसोबत दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंती निमित्त ज्योत आणण्याकरीता सिंहगड येथे जातात. दरवर्षीप्रमाणे १७ मार्च रोजी मध्यरात्री हे सर्व मित्र मोटारसायकलवरुन निघाले होते. फिर्यादी हे अंकुर धावडे याच्या मोटारसायकलवर मागे बसून कोलफायर उडवत चालले होते. वाटेत सुवर्ण बाल तरुण मित्र मंडळाजवळ त्यांच्या कॉलनीत राहणारे अक्षय दिल्लीवाला, ओंमकार निम्हण व त्यांचे २ मित्र थांबले होते. त्यांच्या अंगावर कोलफायर उडाल्यामुळे अक्षय दिल्लीवाला याने माझ्या अंगावर कोल फायर का उडवले, थांब, असे म्हणाला. त्याकडे लक्ष न देता ते सर्व पुढे निघून गेले. त्यानंतर पाठीमागून अक्षय दिल्लीवाला व त्याचे तिघे साथीदार आले. त्यांनी विकास मित्र मंडळ चौकात त्यांना अडविले. अक्षय दिल्लीवाला याच्या हातात लाकडी बांबु होता. फिर्यादी यांनी काय झाले असे विचारताच अक्षय याने हातातील बांबुने मारण्यास सुरुवात केली. सोबत असलेल्या ओंमकार निम्हण व दोन साथीदारांनी हाताने मारहाण केली. फिर्यादी सोबत असलेल्या मित्रांनी भांडणे सोडविली. अंकुर धावडे यांनी फिर्यादी यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. सिंहगड रोडवरील लोकमत कार्यालयासमोर जाऊन ते थांबले असताना फिर्यादी यांना वडिलांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, तुझे विकास चौकात आपल्या कॉलनीतील अक्षय दिल्लीवाला याच्याशी भांडणे झाल्याचे समजल्यावर ते विकास चौकात आले. तेथे अक्षय व ओंमकार यांना भांडणे का केली, असा जाब विचारला असता त्यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. पोलीस हवालदार भंडलकर तपास करीत आहेत.
