हातचलाखीने ATM कार्डची अदलाबदली; 21 ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्यास अटक, 166 एटीएम कार्ड व 14 लाख जप्त

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे : हातचलाखीने ए टी एम कार्डची अदलाबदली करुन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणार्‍या भामट्याला विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police) अटक केली. त्याच्याकडे तब्बल १६६ एटीएम कार्ड सापडली आहेत. त्याने पुण्यातील २१ नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी १६ गुन्हे उघडकीस आणून १३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. (Cheating Fraud Case राजू प्रल्हाद कुलकर्णी (वय ५४, रा. नेताजीनगर, अलानहली, म्हैसूर, कर्नाटक, सध्या रा. धनकवडी) असे या भामट्याचे नाव आहे. त्याच्याकडून १६ गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून त्यात १७ लाख ९२ हजार ७०० रुपयांची रक्कम हडपली होती. त्यापैकी १३ लाख ९२ हजार ९०० रुपये हस्तगत करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे.

शास्त्री रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एकाने ज्येष्ठ नागरिकाचे ए टी एम कार्ड बदली करुन त्यांच्या खात्यातून २२ हजार रुपये काढून घेऊन फसवणुक केली होती. २ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या गुन्ह्याच्या तपासात करताना पोलीस अंमलदार मयुर भोसले व आशिष खरात यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबरीच्या मदतीने राजू कुलकर्णी याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या बँकेचे तब्बल १६६ ए टी एम कार्ड मिळून आले. अधिक चौकशीत त्याने हातचलाखीने अनेकांची फसवणुक केल्याचे उघड झाले.

अशी होती त्याची मोडस

राजू कुलकर्णी हा जेथे पेशन्सची रक्कम काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक येतात. अशा एटीएम मशीन समोर थांबुन राहायचा व ज्या ज्येष्ठ नागरिकांना एटीएम मशीन मधून पैसे काढता येत नाहीत, अशा ज्येष्ठ नागरिकांस पैसे काढण्यास मदत करण्याचे भासवून त्यांच्याकडून एटीएम कार्डचा पिन नंबर व एटीएम कार्ड हातात घेतल्यानंतर हातचलाखीने दुसरे एटीएम कार्ड बदलून एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर तो एटीएम पीन मॅच होत नसल्याचे सांगत असे. बँकेत जाऊन चौकशी करा, असे सांगून तेथून निघून जात असे़ त्यानंतर दुसºया एटीएम मशीनमध्ये जाऊन मिळालेल्या एटीएम कार्डचा वापर करुन पैसे काढून फसवणूक करत असे. अशा प्रकारे अनेक शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांची फसवणुक केली आहे. आतापर्यंत त्याने २१ नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी १६ गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहे. त्यात एकूण १७ लाख ९२ हजार ७०० रुपयांची त्याने फसवणुक केल्याचे उघड झाले आहे. त्यात विश्रामबागमधील ( ५ लाख ७९ हजार), सहकारनगरमधील (३लाख ५५ हजार), कोथरुड (२ लाख ४५हजार), सिंहगड रोड, बिबवेवाडी (प्रत्येकी १ लाख) शिवाजीनगर (८० हजार रुपये) यांचा समावेश आहे.

अनेकांना फसवणुक झाल्याचे समजलेच नाही

विश्रामबाग पोलिसांना मिळालेल्या एटीएम कार्डवरुन त्यांनी फसवणुक झालेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधला. तेव्हा त्यातील अनेकांनी बँक खात्यात किती शिल्लक आहे, हे पाहिले नसल्याने आपली फसवणूक झाली आहे, हे त्यांना समजलेही नव्हते.
कन्नड भाषिकांची घेतली मदत

राजू कुलकर्णी हा काहीही बोलत नाही. आपल्याला मराठी समजत नाही, असे सांगतो. त्यामुळे त्याला बोलते करण्यासाठी पोलिसांनी कन्नड भाषिकांची मदत घेतली. त्याने इतरही शहरामध्ये आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार अशोक माने, मयुर भोसले, सचिन कदम, गणेश कोठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, शिवा गायकवाड, संतोष शेरखाने, नितीन बाबर व सागर मोरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags