पुणे : अनैतिक संबंध असल्याच्या रागातून एका तरुणावर पालघनने वार करुन त्याचा अल्पवयीन मुलांनी खुन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल दशरथ जाधव (वय ३०, रा. उंबरे, ता. भोर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ केतन दशरथ जाधव (वय २७, रा. उंबरे, ता. भोर) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील सागर कॉलनीत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल जाधव हा पुणे महापालिकेतील ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून कामाला होता.
स्वच्छता कर्मचार्यांवर देखरेख करण्याचे काम त्याच्याकडे होते. राहुल हा कोथरुडमध्ये नेहमी येत असतो. काल सायंकाळी तो मोटारसायकलवर थांबला असताना तीन ते चार जणांनी पाठीमागून येऊन त्याच्यावर पालघनने सपासप डोक्यावर, हातावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना राहुल याचा मृत्यु झाला. याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंग कदम यांनी सांगितले की, राहुल याचे कोथरुडमधील एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. त्याचा मुलांना राग होता. या कारणावरुन त्याच्यावर अल्पवयीन मुलांनी पालघनने वार करुन खुन केला आहे. अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.