पुणे: बारामती आगाराच्या एसटी बस चालकाला जेजुरी बस स्थानकवर हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निलेश एकनाथ शेवाळे (वय-५२) असे मृत्यू झालेल्या एसटी बस चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निलेश शेवाळे हे गुरुवारी (दि.३०) बस घेऊन मुरुम येथून पुण्याच्या दिशेने निघाले होते. यावेळी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास एसटी बस जेजुरी बस स्थानकात आली. यावेळी चालक निलेश शेवाळे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच ते आगारात बेशुद्ध पडले. हे पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. जेजुरी आगारातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, एसटी बस मध्ये काही प्रवाशी देखील होते. बस जेजुरी आगारात आल्यानंतर या चालकाला हृदयविकाराचा झटका आला, जर बस चालवत असताना असं झालं असतं तर कदाचित मोठी दुर्घटना घडू शकली असती, अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरु होती. मात्र, बस चालकासोबत ही दुर्दैवी घटना घडल्याने साऱ्यांमधून हळहळ व्यक्त केली जात होती. याबाबत बारामती आगाराचे आगार व्यवस्थापक रविराज घोगरे म्हणाले, जेजुरी बस स्थानकात एसटी बस थांबल्यावर निलेश शेवाळे यांना त्रास जाणवला. शेवाळे यांनी याबाबत त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितले आणि तेवढ्यात ते बेशुध्द झाले. त्यांना तेथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेवाळे यांच्यावर त्यांच्या निरा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे घोगरे यांनी सांगितले.