पुणे : शहरात कर्ण कर्कश्य आवाजाचे सायलेन्सर लावून लोकांना त्रास देणार्या वाहनचालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी मोहिम उघडली. त्यात २२ बुलेट ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांचे सायलेन्सर काढून टाकण्यात आले त्यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलेट चालक हे सायलेन्सर बदलून त्यामधून फटाके फोडत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस ठाण्याच्या स्तरावर ४ पोलीस अधिकारी आणि १५ पोलीस अंमलदार यांची पथके तयार केली. त्यांना लोणी काळभोर परिसरामधील वेगवेगळ्या भागात नेमण्यात आले. मॉडिफाइड सायलेन्सर, विना नंबरप्लेट अशा एकूण २२ बुलेट गाड्या ताब्यात घेण्यात आल्या.
या गाड्यांचे मॉडिफाइड सायलेन्सर काढून घेण्यात आले. तसेच वाहतूक अंमलदार यांच्यामार्फत त्यांच्यावर २५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या वाहनांचे मुळ सायलेन्सर बसवून तसेच ज्यांना गाड्यांना नंबर प्लेट नव्हत्या, त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना नंबर प्लेट बसवून ही वाहने वाहनमालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.
शहरात विविध ठिकाणी रात्रीअपरात्री मोठ्याने आवाज करीत अनेक मोटारस्वार गाड्या फिरवत विकृत आनंद घेत असताना दिसून येते अशा वाहनांवरही शहरातील पोलिसांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.