पिंपरी : हातोडा डोक्यात मारुन सुरक्षा रक्षकाला जखमी केल्यावर कारची काच फोडून चालकाला दरमहा ५०० रुपये खंडणी मागणार्या अल्पवयीन भाईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत बाबासाहेब अंकुश आखाडे (वय ३५, रा. एकदंत हेरिटेज, कृष्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन एका अल्पवयीन मुलावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चिंचवडमधील कृष्णानगर येथील एकदंत हेरिटेज सोसायटीच्या बाहेर रविवारी रात्री साडेबारा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोसायटीच्या बाहेर फोनवर बोलत असताना एका अल्पवयीन मुलगा तेथे आला. त्याने फिर्यादीवर हातोडा उगारुन ५०० रुपये दे, तुला माहिती आहे का मी कोण आहे, मी इथला भाई आहे, टिचक्या भाई म्हणतात मला, असे म्हणून त्याने फिर्यादीचे मित्र नानासाहेब वारे यांची होंन्डाई कारची डाव्या बाजूच्या काचा हातोडीने फोडून नुकसान केले. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन त्याला खिशातील ५०० रुपये दिले. त्यावर त्याने तु मला प्रत्येक महिन्याला ५०० रुपये हप्ता देशील, असे म्हणून तो पुढे गेला. पुढे जाऊन त्याने वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. म्हेत्रे वस्ती येथील यशदा अॅम्बीयन्स सोसायटीमधील सुरक्षा रक्षक उपेंद्र बहादुर शाही यांच्या डोक्यात हातोडी मारुन त्यांना दुखापत केली. पोलीस उपनिरीक्षक देवकुळे तपास करीत आहेत.