राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत, पन्हाळे यांनी मटका, गावठी दारू, जुगार, गुटखा विक्री आणि गांजा विक्री यासारख्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कारवाईंचा धूमधडाका सुरू केला आहे.
पन्हाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे मालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे. चोरी छुपे चालणारे अवैध धंदे खबऱ्यामार्फत शोधून काढून कारवाई करण्यात येत आहे.वेळ प्रसंगी पन्हाळे हे स्वतः स्पॉटवर हजर राहून कारवाई करित आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. या परिस्थितीत पन्हाळे यांच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे. नागरिकांनी पन्हाळे यांच्या कठोर कारवाईचे स्वागत केले आहे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
पन्हाळे यांच्या आगमनानंतर, पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत
राष्ट्रहित टाईम्स शी बोलताना पन्हाळे यांनी सांगितले भविष्यात अवैध प्रवासी वाहतूक, सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय यावर नियंत्रण आणणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे यासाठी कठोर कारवाई सुरुच राहील.त्याचप्रमाणे जे अवैध धंद्यांना बळ देतात , सहकार्य करतात आणि पोलीस कार्यात अडथळे आणतात यांच्यावरही पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.