पुणे : जीममध्ये व्यायाम झाल्यानंतर जीम ट्रेनर यांच्याकडे पुढील वर्क आऊटबाबत विचारणा केली असता तेथील एकाने तरुणाच्या नाकावर जोरात बुक्की मारुन त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. माझे रेकॉर्ड चेक कर, मी तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली. याबाबत राजन जंग सोनी (वय ३३, रा. लाईफ मॉटेज सोसायटी, सुस गाव, ता. मुळशी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी उमेश सुदाम साळेगावकर (वय ३९) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सुस रोडवरील स्टुडिओ व्हेलो सिटी जिममध्ये २८ जानेवारी रोजी सकाळी पावणे दहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनी हे इंटेरियर डिझाईनर आहेत. ते स्टुडिओ व्हॅेलो सिटी जिममध्ये व्यायामाला येतात. जीममध्ये व्यायाम करुन झाल्यानंतर ते जीम ट्रेनर यांच्याकडे पुढील वर्क आऊटबाबत विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे हजर असलेल्या उमेश साळेगावकर याने फिर्यादीला विनाकारण मारहाण केली. फिर्यादीच्या नाकावर जोरात बुक्की मारुन गंभीर दुखापत केली. त्यामध्ये फिर्यादीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. उमेश साळेगावकर याने त्यांना माझे रेकॉर्ड चेक कर, मी तुला मारुन टाकीन, अशी धमकी दिली. पोलीस हवालदार बुलबुले तपास करीत आहेत