माजी नगरसेवक वनराज आंदेकर खुन प्रकरणात 39 साथीदार; 21 आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत 1700 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे : कौटुंबिक वादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर खुन प्रकरणात गुन्हे शाखेने तब्बल ३९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या असून २१ आरोपींविरुद्ध न्यायालयात तब्बल १७०० पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे व त्यांच्या सहकार्‍यांनी हे दोषारोप पत्र १४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात सादर केले. या आरोपींची मोक्का अंतर्गत मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

संजिवनी कोमकर यांचे नाना पेठेत जनरल स्टोअर्सच्या दुकानावर मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. ही कारवाई वनराज आंदेकर याच्या सांगण्यावरुन केल्याचा संशय होता. तसेच संजिवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर व प्रकाश कोमकर कुटुंबियाचे वनराज आंदेकर याचे कुटुंबियाबरोबर मालमत्तेवरुन वाद चालु होते. त्याचा कोमकर यांना राग होता. २०२३ मध्ये आंदेकर टोळीत कृष्णा आंदेकर व इतरांनी टोळी प्रमुख सोमनाथ सयाजी गायकवाड याचे टोळीतील सदस्य निखिल आखाडे याचा खुन केला होता.

या दोन्ही कारणावरुन टोळीप्रमुख सोमनाथ गायकवाड, संजिवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर व प्रकाश कोमकर यांनी इतरांसह कट रचला. १ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजता वनराज आंदेकर याच्यावर आकाश म्हस्के, विवेक कदम, तुषार कदम, समीर काळे यांनी गोळीबार करुन त्याचा खुन केला. या गुन्ह्यात वापरलेले ७ पिस्टल, १३ जिवंत काडतुसे, ७ कोयते जप्त करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या ७ दुचाकी व ३ चारचाकी वाहने जप्त केली. या गुन्ह्यात एकूण ३९ साक्षीदार तपासले आहेत. एकूण २१ आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन ताब्यात आहेत. या २१ जणांवर १७०० पानी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.

दोषारोपपत्रातील महत्वपूर्ण मुद्दे

संघटीत गुन्हेगारी टोळीचे स्थावर व जंगम मालमत्तेबाबतची कायदेशीर कार्यवाही, गुन्ह्यात वापरलेले अग्निशस्त्र पुरवठा करणारे परराज्यातील आरोपींबाबत तपास करुन कार्यवाही, आरोपींना गुन्हा करण्यास मदत करणारे याबाबत तपास करुन पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याची तरतुद ठेवण्यात आली आहे.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे , पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, पोलीस हवालदार विनोद शिंदे, अण्णा माने यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags