पुणे : मालमत्तेच्या कारणावरुन भर रस्त्यात काकाचा निर्घुण खून करणार्या पुतण्यासह तिघांना पोलिसांनी चार तासात जेरबंद केले. शुभम महेंद्र तुपे (वय २८, रा, निम्हण विठ्ठल मंदिराजवळ, पाषाण), रोहन सूर्यवंशी (वय २०, रा. पाषाणगाव), ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. विठ्ठल मंदिराचेजवळ, पाषाणगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महेश जयसिंगराव तुपे (वय ५६) यांचा खुन करण्यात आला होता. याबाबत वरद महेश तुपे (वय १९, रा. निम्हण विठ्ठल मंदिराजवळ, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पाषाण गावातील कोकाटे आळी येथे शनिवारी सकाळी ६ वाजता घडली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश तुपे आणि शुभम तुपे यांच्यामध्ये जागेच्या बाबतीत वाद होता. शुभम तुपे त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत होता. महेश तुपे यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. या कारणावरुन शुभम व त्याच्या दोघा साथीदारांनी कट रचला. महेश तुपे हे शनिवारी सकाळी दुध आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्यावर कोकाटे आळीत तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने डोक्यात, चेहर्यावर, छातीवर व गळ्यावर वार करुन त्यांचा निर्घुण खुन केला.
या खुनाची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस व गुन्हे शाखेचे युनिट ४ चे पथक आरोपींचा शोध घेत होते. पोलीस हवालदार अजय गायकवाड व हरिष मोरे यांनी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की महेश तुपे यांच्या खुनामध्ये सहभागी असलेला ओम निम्हण हा विठ्ठल मंदिराचे पाठीमागील पेरुचे बागेच्या गेटजवळ थांबलेला आहे. या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे व त्यांचे पथक लागलीच तेथे गेले. त्यांनी ओम निम्हण याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले. चतु:श्रृंगी पोलिसांनी शुभम तुपे आणि रोहन सूर्यवंशी यांना अटक केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, हरिष मोरे, विशाल गाडे, विनोद महाजन, एकनाथ जोशी, प्रविण भालचीम, वैभव रणपिसे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे यांनी केली आहे.