पुणे : सासरी होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली. विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सत्र न्यायालयाने तिचा पती, सासु, सासरे अशा तिघांना ७ वर्षाची सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए आय पेरामपल्ली यांनी हा निर्णय दिला.संतोष विठ्ठल पवार, विठ्ठल तुकाराम पवार आणि मंगल विठ्ठल पवार (सर्व रा. १५ नंबर, मनिष सुपर मार्केटमागे, लक्ष्मी कॉलनी, हडपसर)अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. सविता संतोष पवार असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना हडपसरमधील लक्ष्मी कॉलनीमध्ये २५ मे २०१३ रोजी घडला होता. सविता आणि संतोष यांचा ३० नोव्हेबर २०१२ रोजी विवाह झाला होता. लग्नात राहिलेली भांडी, दोन तोळे सोने, कुलर, फ्रीज, पिठाची गिरणी इत्यादी वस्तु दिल्या नाहीत. त्या घेऊन येण्याकरीता हुंड्यासाठी सविताचा मानसिक व शारीरीक छळ करुन मारहाण केली जात होती. या छळाला कंटाळून सविता पवार हिने २५ मे २०१३ रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यातच तिचा मृत्यु झाला. पोलीस उपनिरीक्षक बी एम पवार यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सबळ पुराव्याअंती न्यायालयाने तीनही आरोपींना ७ वर्षे सक्तमजुरी व ८ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील प्रदिप गेहलोत, कोर्ट पैरवी श्रीशैल तेलुनगी, सहायक फौजदार अविनाश गोसावी यांनी कामकाज पाहिले. या कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी सहायक फौजदार श्रीशैल तेलुनगी व पोलीस हवालदार अविनाश गोसावी, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी एम पवार यांना १० हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.