पुणे : मयुर आरडे टोळीतील सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांनी मारामारीच्या गुन्ह्यात अटक केली. या सराईत गुन्हेगाराला न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस कोठडीत घेऊन जात असताना त्याने पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्याला जागेवर पकडल्याने पुढील अनर्थ टळला. जयेश ऊर्फ जयड्या दत्ता धावरे (वय २१, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे या आरोपीचे नाव आहे. मयुर आरडे टोळीवर दोन वर्षांपूर्वी मोक्का कारवाई करण्यात आली होती. त्यात जयेश धावरे याचा समावेश होता. काही दिवसापूर्वी जयेश धावरे याने मारामारी केली होती. त्याच्यावर सहकारनगर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला होता. त्यात त्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. त्याला रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी मंजूर केली. त्यानंतर त्याला विश्रामबाग लॉकअपमध्ये जमा करण्यासाठी आणले गेले. पोलिसांनी व्हॅनचा दरवाजा उघडण्यापूर्वी जयेश धावरे याने दरवाजा उघडून बडीसह पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क असलेल्या पोलिसांनी त्याला लगेचच पकडले आणि लॉकअपमध्ये जमा केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी दिली.
