पुणे – स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अटक केल्यानंतर लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.चौकशीदरम्यान त्याने भावनिक होत टाहो फोडल्याची माहिती समोर आली आहे.’माझं चुकलंय, मी पापी आहे,’ असे म्हणत तो पोलिसांसमोर रडला. मात्र, त्याने बलात्काराच्या आरोपांचं खंडन करत आमचे संबंध परस्पर संमतीने झाल्याचा दावा केला आहे.लष्कर पोलीस ठाण्यात आरोपी दत्ता गाडेची कसून चौकशी सुरू आहे. यावेळी त्याने आपण गुन्हेगार असल्याचं कबूल केलं, मात्र बलात्काराच्या आरोपांवर आक्षेप घेतला. ‘मी अत्याचार केलेला नाही, आमचे संबंध संमतीने झाले होते,’ असा दावा त्याने केला आहे. चौकशीदरम्यान गाडे रडत होता आणि त्याला मोठा मानसिक ताण जाणवत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
दत्ता गाडेच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. जर त्याचा दावा सत्य असेल, तर पीडित तरुणीने बलात्काराचा आरोप का केला, हा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.दरम्यान, दत्ता गाडेला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन दिवस मोठी शोधमोहीम राबवली. अखेर मध्यरात्री दीड वाजता शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी ड्रोन आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने त्याचा शोध घेतला. आता त्याच्या दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
