पुणे – घोळक्यात उभ्या असलेल्या मित्राला बरोबर चल असे म्हणाल्याने टोळक्याने तरुणाला तू मोठा शहाणा झाला का, असे म्हणून दगडी फरशीने मारहाण करुन जखमी केले. आई वाचविण्यास आली तर तिलाही मारहाण केली.मुलाला घेऊन आई उपचारासाठी रुग्णालयात गेली असताना टोळक्याने घरात शिरुन सामानाची तोडफोड केली.याबाबत सुमित संतोष सावंत (वय २१, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आकाश मोरे, जतिन भोळे, रोहित शेट्टी, सनी सणस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीतील समाज मंदिर येथे १६ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्री कळस येथे जाणार होते. त्यासाठी ते घरातून बाहेर पडले. समाज मंदिराजवळ मुले उभी होती. फिर्यादी व त्यांचा मित्र हर्षद साळुंखे यांनी या मुलांमधील एका मित्राला आपल्याबरोबर चल असे म्हणाले. त्यावर टोळक्यातील मुलांनी तु मोठा शहाणा झाला का, असे म्हणून फिर्यादी व हर्षद साळुंखे यांना फरशीने मारहाण केली. त्यांच्या वाचविण्यासाठी त्याची आई मध्ये पडली असता त्यांनाही या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मोठमोठ्या ओरडून आम्ही इथले भाई आहोत, आमच्या वाट्याला जायचे नाही नाहीतर आम्ही कोणाला सोडणार नाही, असे म्हणून दहशत निर्माण केली. त्यामुळे लोक घाबरुन निघून गेले. फिर्यादी हे जखमी झाल्याने भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते. तेव्हा हे टोळके त्यांच्या घरात शिरले. त्यांनी घरातील फ्रिज, गॅस शेगडी व इतर सामानाची तोडफोड केली. ज्या मित्राला ते बोलवायला गेला होता, तोही या टोळक्याबरोबर तोडफोडीत सामिल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख तपास करीत आहेत.