पुणे : मुलीसोबत लग्न करण्याचा विषय एका ४५ वर्षाच्या गृहस्थाने केल्याने चिडलेल्या चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात उपचार सुरु असताना एकाचा मृत्यु झाला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यात आता खुनाचे कलम वाढविले आहे. दिलीप यल्लपा अलकुंटे (वय ४५, रा. नवनाथ सोसायटी पाठीमागे, जनवाडी) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्याची वहिनी पुष्पा राजेश अलकुंटे (वय ३३) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रामजी निलु राठोड (वय ५०), अनुसया रामजी राठोड (वय ४५), करण रामजी राठोड (वय १९, सर्व रा. पठाण वस्ती, जनवाडी) आणि एक अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल केला केला असून तिघांना अटक केली आहे. हा प्रकार गोखलेनगरमधील ओंबाळे मैदानात शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप यल्लपा अलकुंटे हे मजुरी काम करत होते. ते आरोपीच्या मुलीसोबत माझे लग्न लावून द्या, असे सांगत होते. तेव्हा त्यांनी तुझे वय काय आमच्या मुलीचे वय काय असे सांगून त्याचा लग्नाचा विषय दूर सारला होता. त्यानंतरही शनिवारी सकाळी गोखलेनगरमधील ओंबाळे मैदानात दिलीप अलकुंटे याने हा विषय पुन्हा काढला. तेव्हा आरोपींनी याला आता जीवंत गाडू असे म्हणून चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत दिलीप अलकुंटे याला रुग्णालयात दाखल केले होते. डोक्याला मार लागल्याने त्यात दिलीप अलकुंटे याचा रविवारी मृत्यु झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करीत आहेत.