पुणे :पद्मावतीतील तळजाई वसाहतीत दहशत माजविणार्या गुंडाविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एम पी डी ए) कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. साहिल ऊर्फ भावड्या संतोष कुचेकर Sahil Alias Bhavdya Santosh Kuchekar (वय २१, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याकरीता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक पावले उचलली असून शहरातील सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले होते. (Sahakar Nagar Police)
साहिल कुचेकर याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात २०२२ पासून आजपर्यंत गुन्हेगारी कारवायामध्ये सक्रिय आहे. त्याचे विरुद्ध शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये घातक हत्यारे जवळ बाळगून मनाई आदेशाचा भंग करुन दहशत निर्माण करणे, दुखापत करणे, वाहनांची तोडफोड करणे, जबरी चोरी करताना खुनाचा प्रयत्न करणे यासारखे ५ गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. साहिल कुचेकर याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्याच्या वागणुकीत काही एक फरक पडलेला नव्हता. तो अत्यंत क्रुर, खुनशी व भांडखोरअसून तो लोकांमध्ये काही ना काही कुरापती काढून मारहाण करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी त्यास स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सादर केला. या प्रस्तावाची पडताळणी करुन अमितेश कुमार यांनी त्याला नागपूर कारागृहात एक वषार्साठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
हा आदेश झाल्यापासून साहिल कुचेकर हा फरार झाला होता़ सहकारनगर तपास पथकाने त्याला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथून २ मार्च रोजी ताब्यात घेतले. त्याची नागपूर कारागृहात रवानगी केली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त स्मातना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सुरेखा चव्हाण यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार भाऊसाहेब आहेर, अमोल पवार, महेश मंडलिक, सागर सुतकर, विनायक एडके, बजरंग पवार, आकाश किर्तीकर, अमित पदमाळे, गोरख ढगे, योगेश ढोले, महेश भगत, प्रदिप रेणुसे, खंडु शिंदे यांनी केली आहे.