पिंपरी : तुमचे बील भरलेले नसल्याने आज रात्रीपासून तुमचे वीज कनेक्शन कट होणार आहे. असा मेसेज देवेश जोशी अधिकारी या नावाने लोकांना पाठविला जातो. त्यावर एक मोबाईल नंबर दिलेला असतो. घाबरुन लोक त्या नंबर संपर्क साधतात. आम्ही बील भरले असल्याचे सांगतात. तेव्हा ती व्यक्ती तुमचे बील अपडेट केलेले दिसत नाही, असे सांगून त्यांना एक लिंक पाठवून त्यात माहिती पाठविण्यास सांगतात. ती माहिती दिल्यावर त्यांचे बँक खाते रिकामे होते. देशभरात गेल्या दोन वर्षांपासून देवेश जोशी याच्या नावाने असे मेसेज पाठवून सायबर चोरट्यांनी हजारो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. पूर्वी वीज कनेक्शन, त्यानंतर गॅस कनेक्शन आता पाण्याचे कनेक्शन कट करणार असल्याची भिती दाखवून सायबर फसवणुक केली जाऊ लागली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्याच्या नावाने अनेकांची फसवणुक केली जात असल्याचे समोर आले आहे़
याबाबत निगडी यमुनानगर येथील ७६ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना चालू महिन्याचे पाण्याचे बिल अपडेट नसल्याने पिंपरी चिंचवड महानगर पालिका पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याचे कनेक्शन कट करणार असल्याची भिती घालणारा मेसेज आला. दिवेश जोशी यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. फिर्यादी यांनी संपर्क केल्यावर त्याने पिपंरी चिचवड मनपा अधिकारी असल्याचे व तो मेसेज पिंपरी चिंचवड मनपाकडून पाठविल्याचे भासविले. भरलेले पाणी बिल अपडेट करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा लोगो व त्याखाली पीसीएमसी वॉटर बील अपडेट (PCMC WATER BILL UPDATE) असे प्रोफाईल असलेल्या व्हॉटसअप नंबरवरुन त्यांना पाईपलाईन वॉटर अपडेट डॉट एपीके (Pipeline water update .apk) नावाची फाईल पाठविली. ही फाईल डाऊनलोड करायला भाग पाडले. त्यांनी ही फाईल डाऊनलोड करताच त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ६५ हजार ५०९ रुपये काढून घेऊन त्यांची फसवणुक केली आहे.
महापालिकेत चौकशीसाठी लोकांची गर्दी
महापालिकेचा लोगो स्टेटसला ठेवून मोबाईलधारक बोलत असल्याने लोकांना संबंधित व्यक्ती महापालिकेतून बोलत असल्याचा समज होतो. त्यामुळे अनेकांच्या बँक खात्यातून हजारो रुपये काढून घेतले गेले. चौकशीसाठी नागरिक पिंपरी महापालिकेत जातात, तेव्हा महापालिकेने कसा कोणताही मेसेज पाठवला नसून सायबर चोरट्याने फसवणुक केल्याचे त्यांच्या लक्षात येते़ सायबर पोलिसांनी आता एक फिर्याद दाखल करुन घेतली असून पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील तपास करीत आहेत.
दोन वर्षापासून सुरु आहे फसवणूक
दोन वर्षांपासून मे २०२३ मध्ये सर्वप्रथम सायबर चोरट्यांनी एमएससीबीच्या नावाने महाराष्ट्रात वीज बील भरले नसल्याने आज तुमचा वीज पुरवठा रात्री ९ वाजता खंडीत करण्यात येईल, असा टेक्स मेसेज व त्यावर देवेश जोशी अधिकारी या नावाने मोबाईल नंबर दिलेला होता. तेव्हापासून महाराष्ट्रात एमएससीबीच्या नावाने तर इतर राज्यात त्या त्या राज्यातील बोर्डाच्या नावाने फसवणुक करण्यास सुरुवात झाली होती.