पुणे : पुणे परिसरातून शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर फसवणुकीसाठी लागणारे बँक खात्याचे रॅकेट चालविणार्या झारखंड, गुजरात, उडिसा येथील ६ जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. पुणे परिसरातून हे सर्व जण कंबोडिया येथील मुख्य सायबर चोरट्याला बँक खात्यांची माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीने कंबोडिया येथील बसलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीला हजारो बँक अकाऊंट दिल्याचे दिसून येत आहे. या आरोपींकडे मिळून आलेल्या अकाऊंटवर भारतभरात एकूण १०२ तक्रारी असल्याचे दिसून आले आहे.
सायबर पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यामधील फिर्यादी यांना वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन आरोपींनी ऑनलाईन व्हॉटसअॅप ग्रुप फुचर आऊटलुट व व्हीआयपी ३७ या व्हॉटसअॅप ग्रुप मध्ये अॅड करुन त्यांचे कंपनीची वेबलिंक व अॅप्लिकेशनची लिंक पाठविलेले लिंकवरुन त्यांचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्यामार्फतीने वेगवेगळ्या बँक अकाऊंटला ७ लाख ६० हजार रुपये भरायला सांगून फसवणूक केली होती.
