पिंपरी : पोलीस चौकीत आरोपीचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न

Facebook
Twitter
WhatsApp

पिंपरी : एक तरुण विनयभंगाच्या गुन्ह्यात फरार होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तरुण बेपत्ता असल्‍याची फिर्याद दिली होती. पोलीस त्‍याचा शोध घेत असल्‍याने तो स्‍वतः पोलीस चौकीत हजर झाला. मला का शोधत आहात, अशी विचारणा करत त्‍याने साफसफाईसाठी वापरण्‍यात येणारे औषध प्राशन करून आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्याची घटना घडली आहे. ही घटना चिंचवड येथील मोहननगर चौकीत गुरुवारी (दि. ६) रात्री अकरा वाजताच्‍या सुमारास घडली. रुपेश राम बहिरवाडे (वय २५, रा. चिंचवड स्‍टेशन जवळ, चिंचवड) असे आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केलेल्‍या तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्‍या त्‍याच्‍यावर आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्‍याप्रकरणी गुन्‍हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार दत्‍तात्रय भागुजी निकम (वय ४३) यांनी शुक्रवारी (दि. ७) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी रुपेश याच्‍यावर दोन महिन्‍यांपूर्वी विनयभंगाचा गुन्‍हा दाखल झाला होता. तेव्‍हापासून तो घरातून निघून गेला होता. यामुळे त्‍याच्‍या कुटुंबीयांनी रुपेश बेपत्ता असल्‍याची फिर्याद दिली. या दोन्‍ही प्रकरणात पिंपरी पोलीस रुपेश याचा शोध घेत होते. दरम्‍यान तो आपल्‍या सोशल मीडियावर पोस्‍ट करत असल्‍याने विनयभंगातील फिर्यादी व तिचे कुटुंबीय भयभीत झाले होते. आरोपीला अटक करण्‍याची मागणी त्‍यांच्‍याकडून वारंवार होत असल्‍याने पोलीस त्‍याचा शोध घेत होते.

दरम्‍यान, गुरुवारी रात्री आरोपी रुपेश हा पोलीस चौकीत आला. तुम्‍ही माझा शोध का घेत आहात. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्‍हा दाखल केला, असे म्‍हणत त्‍याने साफसफाईसाठी वापरण्‍यात येणारे औषध पोलीस चौकीतच प्राशन केले. त्‍यानंतर त्‍यास खासगी रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करून कुटुंबियांच्‍या स्‍वाधिन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags