पोलीस हवालदाराला बेदम मारहाण प्रकरणात पोलिसांकडूनच सहकाऱ्यावर अन्याय !

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे : बंदोबस्तावरुन रात्री उशिरा परत आलेल्या व रस्त्यात गोंधळ घालणार्‍या तरुणांना हटकल्याने चौघांनी पोलीस हवालदाराला बेदम मारहाण केली. परंतु, वर्दीवर हात टाकणार्‍यांना दणका देण्याऐवजी पोलीस त्यांनाच पाठीशी घालत असल्याचे दिसून आले. राजकीय दबावामुळे चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे (Chaturshringi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील (Sr PI Vijayanand Patil) यांनी फिर्यादीलाच तडजोड करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर हे प्रकरण पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांच्या कानावर गेले. त्यांनी खरडपट्टी काढल्यानंतर तीन दिवसांनी गुन्हा दाखल करुन चतु:श्रृंगी पोलिसांनी चौघांना अटक केली.

याबाबत पोलीस हवालदार मॅग्गी उर्फ चंद्रकांत विष्णु जाधव Maggie alias Chandrakant Vishnu Jadhav (वय ४२, रा. रामोशीवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रुपेश मांजरेकर (वय २५), अनिकेत राजेश चव्हाण (वय २१), अनिकेत घोडके (वय २४ ), अभि डोंगरे (वय २४, सर्व रा. रामोशीवाडी, वडारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत जाधव हे सहकारनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार आहेत. ते १५ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजता बंदोबस्तावरुन कारने घरी आले. त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला कार पार्क केली. त्यावेळी तेथे रुपये मांजरेकर, अनिकेत राजेश चव्हाण, अनिकेत घोडके, अभि डोंगरे हे गोंधळ घालत बसले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना एवढ्या रात्री का गोंधळ घालत आहात, म्हणून जाब विचारला. तेव्हा अनिकेत घोडके व अभि डोंगरे हे पाठीमागून आले व त्यांनी जाधव यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रुपेश मांजरेकर हा समोरुन आला. त्याने बुक्क्यांनी मारहाण केली.

जाधव यांना ओढत नेऊन तेथे उभ्या असलेल्या एका रिक्षात ओढले. त्या ठिकाणी अनिकेत चव्हाण रुपेश यांनी त्यांच्या डोक्यात, तोंडावर व छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना रिक्षातून ओढताना रुपेश मांजरेकर हा अनिकेत घोडके याला म्हणाला की, ”तो दगड उचल आणि ठार मारुन टाक त्या पोलिसाला म्हणजे हा आपल्या कधीच आडवा येणार नाही.” त्यानंतर घोडके याने हातात दगड घेऊन जाधव यांच्या कपाळावर, डोक्यावर जोरदार मारले. त्यांना मारण्याचा प्रयत्न करीत असताना जाधव यांनी दोन तीन वेळा डोक्यावरील वार चुकविले. त्यानंतर ते रिक्षातून बाहेर आले.

मोबाईल काढून त्यांनी या मारहाण करणार्‍या मुलांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जाधव यांनी त्यांचा मित्र प्रविण कासार (रा. रामोशीवाडी) याला फोन करुन मदतीसाठी येण्यास विनंती केली. ते पाहून चौघांनी पुन्हा त्यांना पकडले व त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. सर्व जण दुचाकीवरुन पळून गेले. त्यांचा मित्र प्रविण कासार, त्यांच्या भाऊ किरण जाधव हे तेथे आले. त्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात नेले. तेथून वैद्यकीय यादी घेऊन ते ससून रुग्णालयात गेले. त्यांच्या डोक्याला मार लागला असल्याने त्यांचा सिटी स्कॅन काढण्यात आला. उपचार घेऊन ते दुपारी १२ वाजता चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. परंतु, पोलिसांनी त्यांची सुरुवातीला दखलच घेतली नाही. त्यांना बराच वेळ बसवून ठेवले. दुपारी अडीच वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील हे आल्यानंतर त्यांनी सर्व हकीकत समजून घेतली. जाधव यांनी सर्वांची नावे तसेच तेथील गणेश मंडळाकडील सीसीटीव्ही फुटेज दिली. पाटील यांनी सर्व बाबी आपल्या नोटबुकमध्ये नोंदवून घेतल्या. पोलिसांचा तरंग कार्यक्रम दोन दिवसांवर आला आहे.

पत्रकार पोलिसांना मारहाण झाल्याचे मुख्यमंत्री यांना प्रश्न विचारतील. तेव्हा त्यांना आज रात्री उचलतो, तुम्हाला कळवितो, असे सांगून त्यांना वाटेला लावले. पुढील दोन दिवस जाधव हे घरीच होते. रविवारी सकाळी एका पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना जवळच्या हॉटेलमध्ये बोलावले. सिनियरसाहेबांनी पाठविले आहे, असे त्या पोलिसाने जाधव यांना सांगितले. त्या चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करतो, असा साहेबांचा निरोप असल्याचे त्या पोलिसाने सांगितले. त्यावर जाधव म्हणाले म्हणजे माझ्या डोक्यात इतके लागलेले तुम्हाला दिसतेय. तरी तुम्ही एनसी दाखल करतो, असे कसे तुम्ही म्हणता.

मी काय खोटे सांगतो का, काय तो गुन्हा दाखल करा, असे जाधव यांनी यांनी सांगितले. त्या दरम्यान, जाधव यांचा मोबाईल चोरीला गेला असल्याने त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी त्यांच्या भावाला व इतरांना फोन करुन चौकशी करत होते. त्यांना मारहाणीचे आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करुन न घेतल्याचे समजले. ही गोष्ट पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यापर्यंत पोहचली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी रविवारी रात्री तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रात्री उशिरा चतु:श्रृंगी पोलिसांनी चंद्रकांत जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. गुन्हा दाखल करताना त्यात काय भाषा असावी, याबाबत गुन्हा दाखल करुन घेणारे वारंवार व्हॉटसअ‍ॅप करुन वरिष्ठांना विचारत होते. शेवटी पहाटे ३ वाजून १६ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना सोमवारी बोलावून घेतले. त्यांची खरडपट्टी काढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मग पोलिसांनी हालचाल करुन चौघांना अटक केली. न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. वर्दीवर हात टाकणार्‍यांना राजकीय दबावामुळे कारवाई करण्यास कुचराई वरिष्ठ पोलीस अधिकारी करत असतील आणि पोलिसांवरच अन्याय करत असतील तर ते सामान्यांना न्याय कधी देतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags