पुणे: इंस्टाग्रामवर ओळख होऊन त्याचे रूपांतर प्रेमात झाले.आरोपी प्रियकराने प्रेम असल्याचे सांगून इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. त्याने तिचे फोटो, व्हिडिओ काढले. त्यानंतर हेच फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीला मित्रांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. १८ वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
त्यानुसार दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी १७ वर्षे ६ महिन्याची असताना तिची ओळख एका आरोपी सोबत इंस्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर दोघे भेटत राहिले. त्यावर आरोपीने तिच्यावर आपले प्रेम असल्याचे सांगून तिच्या इच्छेविरोधात शरीर संबंध ठेवले. याचे व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर हेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी आणि त्याच्या मित्राने पीडित तरुणी सोबत शरीर संबंध ठेवले. दरम्यान त्यानंतर ही दोघे वारंवार पीडितेला ब्लॅकमेल करत होते. शेवटी पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पर्वती पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहिता ६४(१), ७०(१) सह पॉक्सो ४,८,६,१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल मोरे करीत आहेत.