पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील कला शिक्षकांची ‘कला’ चांगलीच भोवली ! बनावट जीआर काढून शिक्षणाधिकार्‍यांच्या नावे 17 लाख रुपये गोळा करणार्‍यावर गुन्हा दाखल

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील विविध माध्यमिक शाळांमधील ५० अपदवीधर कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी अवर सचिव प्रविण मुंढे यांच्या नावाने बनावट जी आर काढून या शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांना देण्यासाठी १७ लाख रुपये गोळा करणार्‍यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. डॉ. दीपक चांदणे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल बबन भोसले यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्यालयात १९ ऑक्टोबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमिक शाळांमधील अपदवीधर कला शिक्षक ज्यांनी एटीडी ही पदविका धारण केलेली आहे. अशा शिक्षकांना एएम ही पदवी धारण केल्यानंतर वरिष्ठ पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करण्यात आला होता. डॉ. दीपक चांदणे याने आपली शिक्षण विभागामध्ये ओळख असल्याचे भासविले. शासनाकडून आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या हेतूने इतरांशी संगनमत करुन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे अवर सचिव प्रविण मुंढे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करुन बनावट शासन निर्णय तयार केला. तसेच या बनावट शासन निर्णयाचा संदर्भ टाकून शिक्षणाधिकारी यांचे बनावट सह्यांचा एएम मान्यतेचा बनावट आदेश तयार केला. या कामासाठी डॉ. दीपक चांदणे याने शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांना देण्याकरीता या शिक्षकांकडून एकूण १७ लाख रुपये गोळा केले. बनावट शासन निर्णय व्हॉटस अपद्वारे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांना मिळाला. त्याची छाननी करण्यात आल्यानंतर संबंधित शासन निर्णय राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कोठेही आढळून आलेला नाही. शिवाय अवर सचिव प्रविण मुंढे यांच्या बनावट स्वाक्षरीने हा बनावट आदेश काढण्यात आल्याची बाबही समोर आली. त्यानंतर डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्या महिन्यात तक्रार केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या शिक्षकांशी, मुख्याध्यापकांकडे चौकशी केली. त्यानंतर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक निता मिसाळ तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags