पुणे :लोणी काळभोर परिसरातील रामदरा येथे ओढ्याचे बाजूला सुरु असलेल्या गावठी दारुच्या भट्टीवर गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने कारवाई केली. त्यात दीड हजार लिटर तयार दारु, २० हजार लिटर रसायन, असा एकूण ११ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. हातभट्टी चालविणारा मुकेश् कर्णावत हा अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून गेला. पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस हवालदार कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे हे कोंबिंग ऑपरेशन करत होते. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओढ्याचे बाजूला रामदरा रोड येथील मोकळा रोड परिसरात मुकेश कर्णावत हा हातभट्टीची गावठी दारु तयार करत आहे. या माहितीच्या अनुशंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव व सहकार्यांनी शोध घेतला असता गावठी दारुची हातभट्टी सुरु असल्याचे दिसून आले. हातभट्टी चालविणारा मुकेश कर्णावत हा जंगलात पळून गेला.
त्या ठिकाणी १५०० लिटर तयार दारु १०० रुपये प्रति लिटर प्रमाणे एकूण १ लाख ५० हजार रुपये तसेच २० हजार लिटर रसायन, ५० रुपये प्रति लिटरप्रमाणे १० लाख रुपये तसेच दारु करण्याचे साहित्य, मोटार, ड्रम, एअर ब्लोअर सरपण व इतर साहित्य असा एकूण ११ लाख ६० हजार रुपयांचा माल मिळाला.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक अनिल जाधव, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, हवालदार कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याकडील हवालदार सातपुते, वनवे, पोलीस अंमलदार वीर, योगेश पाटील, शिरगिरे यांनी केली आहे.