सराईत गुन्हेगाराने तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडले; रामनगरमधील म्हसोबा टेकडीवरील घटना

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे : रात्री फिरायला गेलेल्या तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन सराईत गुन्हेगाराने त्यांच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत शैलेश विठ्ठल खंडागळे (वय २३, रा. अमरज्योत मित्र मंडळ, रामनगर, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ढेण्या ऊर्फ ओमकार चौधरी, अमन शेख, कुमार डोळसे, जय भोंडेकर (सर्व रा. रामनगर, वारजे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ढेण्या ऊर्फ ओमकार चौधरी याच्यावर चार खुनाचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट असे पाच गुन्हे दाखल आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे दाजी महेश क्षीरसागर यांच्यासोबत म्हसोबा टेकडी येथे ८ फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता वॉर्किंगला गेले होते. ते टेकडीच्या परिसरात चालत जात असताना त्यांच्या भागातील आरोपी हे त्यांच्या दिशेने येत असल्याचे त्यांनी पाहिले. तेव्हा ते घाबरुन पळून जाऊ लागले. तेव्हा ढेण्या चौधरी याने दगड फेकून मारुन जागीच थांबण्यास सांगून ‘पळून गेलास तर जिवे मारीन’ अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरुन ते जागीच थांबले. ढेण्या चौधरी याने त्यांच्यावर धारदार हत्यार उगारले. कुमार डोळसे व जय भोंडेकर यांनी फिर्यादीला पकडून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पाकीट तसेच पाकीटात असलेले ३०० रुपये व आधारकार्ड हे जबरदस्तीने काढून घेऊन चोरी केली. वारजे माळवाडी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगदाळे (PSI Sunil Jagdale) तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags