शिरीष महाराजांची काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट सापडली; आत्महत्येचं सुन्न करणारं कारण समोर!

Facebook
Twitter
WhatsApp

संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून ओळख असलेले शिरीष महाराज मोरे (30) यांनी आत्महत्या केली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी त्यांची जीवनयात्रा संपली आहे. त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? असे समस्त महाराष्ट्रात विचारले जात होते. असे असतानाच आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या सापडल्या आहेत. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी मन सुन्न करणारी कहाणी सांगितली आहे. सोबतच त्यांनी आत्महत्येचं कारणही सांगितलं आहे.

एकूण चार चिठ्ठ्या लिहिल्या

शिरीष मोरे हे संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज होते. त्यांच्या जाण्याने राज्यभरात दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर आता त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या समोर आल्या आहेत. या चिठ्ठीमध्ये त्यांनी कर्जाचा उल्लेख केला आहे. सोबतच कोणाचे किती रुपयांचे कर्ज आहे, हेही सांगितले आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये होणाऱ्या बायकोचाही उल्लेख केला आहे. शिरीष मोरे यांनी एकूण चार चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. प्रत्येक चिठ्ठीत वेगळा मजकूर आहेत. यातील एका चिठ्ठीत त्यांनी त्यांच्या होणाऱ्या पत्नीचा उल्लेख केला आहे.

चिठ्ठीमध्ये नेमकं काय आहे?

“माझी लाडकी पिनू, प्रियांका…खरं तर तुझा आता कुठं हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणी मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काल घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. माफ कर. आयुष्यात सर्वांत जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही,” असं शिरीष महाराजांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय

यासह, “माझ्या वाईट कालात तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्नं तोडून जातोय,” असंही शिरीष महाराजांनी म्हटलंय.

एवढा काळ थांबलीस, आता…

“कुंभमेळा राहिला, वारी राहिला, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू. तू खूप गोड आहेस. निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल. जप स्वत:ला. एवढा काळ थांबलीस. आता मीच नसेल त्यामुळे थांबू नको. पुढे जा. खूप मोठी हो. आणि हो खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम हो. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या. मला माफ कर… तुझाच अहो.. शिरीष” असंही शिरीष महाराजांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.

तिच्यासाठी चांगला मुलगा बघा

यासह मित्रांना उद्देशून लिहिलेल्या दुसऱ्या चिठ्ठीत त्यांनी प्रियांका यांचे लग्न लावून देण्याचीही विनंती केली आहे. “…आणि हो आमची नवरीबाई. तिची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त करून मी चाललो आहे. खूप गोड आहे प्रियांका. तिला कधी वेळच देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा बघा. नाहीतर ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो,” असंही शिरीष मोरे यांनी म्हटलंय. दरम्यान त्यांनी एका चिठ्ठीमध्ये आत्महत्येचं नेमकं कारण सांगितलेलं नाही. मात्र त्यांनी चिठ्ठ्यांमध्ये कर्जाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी आयुष्य संपवलं असावं असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. सोबतच त्यांनी आयुष्याची इतिकर्तव्यता संपली आहे, समजून पूर्णविराम देत आहे, असं म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags