पुणे : स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी (दि. २५) सकाळी साडेपाचच्या सुमारास प्रवासी तरुणीला धमकावून दत्ता गाडे या नराधमाने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पीडित मुलीवरही विविध आरोप होत आहेत. तरुणीच्या सहमतीने दोघांमध्ये शरीरसंबंध झाल्याचे आरोपीचा वकील आणि दत्ता गाडेच्या पत्नीने म्हटले आहे. तर पैसे न दिल्याने वाद होऊन तरुणीने तक्रार दिल्याचे काही नेत्यांनी म्हटले आहे. या सगळ्या चर्चा सुरू असताना पीडित तरुणीने शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक वसंत मोरे (Vasant More) यांना संपर्क केला. दोघांमध्ये काय बोलणे झाले, याबद्दल वसंत मोरे यांनी माहिती दिली आहे माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, “प्रकरण घडलं, त्यानंतर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मला संबंधित मुलीचा आणि तिच्या मित्राचा कॉल आला. ती मुलगी माझ्याशी फोनवर बोलली. ती प्रचंड रडत होती. तिने मला सांगितले, अत्याचार झाला त्यावेळी बस शेजारी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर उभे होते. त्यावेळी मी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. पीडितेने त्यांना आरोपी गाडेची गैरकृत्याची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावले सुद्धा परंतु तोपर्यंत आरोपी दत्तात्रय गाडे तेथून पसार झाला होता” , अशी माहिती वसंत मोरे यांना पीडितीने दिली होती.
ते पुढे म्हणाले, “२० मिनिते मी त्या मुलीशी बोललो. प्रचंड रडत होती. कालपण आम्ही तिच्यासोबत बसलो होतो. ती सुशिक्षित तरुणी आहे. तिच्यावर ज्या पद्धतीने साडेसात हजार रुपये घेतल्याचा आरोप होत आहे. आज त्या सगळ्या गोष्टी ‘दूध का दूध और पानी का पानी’ झाल्या आहेत”, असे मोरे यांनी म्हंटले.