पुणे – पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगार बलात्कार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. पण त्याहून धक्कादायक म्हणजे, ज्या पीडित तरुणीवर अत्याचार झाले तिच्याबद्दल चुकीची माहिती वकिलानेच प्रसारमाध्यमांना दिल्याची माहिती आता समोर आली आहे.एवढंच नाहीतर, जेव्हा या वकिलाला विचारलं चुकीची माहिती का दिली, तर त्याने पळ काढला. दरम्यान, या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला पुणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.स्वारगेट एसटी आगारामध्ये बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये दत्ता गाडे या नराधमाने एका तरुणीवर अत्याचार केले होते. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी दत्ता गाडेला गावातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीवेळी, आरोपीचा वकील ॲड सुमित पोटे यांनी माध्यमांशी बोलताना ‘आरोपीने पीडित तरुणीला साडेसात हजार रूपये दिले होते’ अशी माहिती दिल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र हा युक्तिवाद न्यायालयात केलाच नसल्याचं नंतर उघड झालं होतं. माध्यमांना खोटी माहिती देऊन पीडित महिलेच्या बाजूने असलेली सहानुभूती कमी करण्याचा या वकिलाचा प्रयत्न होता.आज सुनावणीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, ‘७५०० रुपयांचा कुठला ही युक्तिवाद न्यायालयासमोर झाला नसल्याची कबुली दिली. कोर्टासमोर युक्तिवाद संपल्यावर आरोपी गाडे याने ही माहिती आम्हाला दिली होती आणि त्यावरूनच आम्ही माध्यमांशी बोललो अशी सारवासारव गाडे याचे वकील पोटे यांनी केली.
‘एक वकील म्हणून असं बेजबाबदार वक्तव्य करणं संयुक्तिक आहे का? असा प्रश्न माध्यमांनी पोटे यांना विचारला असता त्यांनी मात्र उत्तर देणे टाळून अक्षरश: पळ काढला. पण यामुळे ७५०० रुपयाचा विषय न्यायालयासमोर युक्तिवाद न करता माध्यमांना हाताशी धरून समाजात खोटी माहिती देणाऱ्या या वकिलांवर पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्न आता उभा राहिला आहे.
