पुणे : हातभट्टीची वाहतूक करणार्या पिकअपला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकांनी अडविले. या व्हॅनला सरंक्षण देणार्या अॅल्टो कारने दुय्यम निरीक्षकांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना खाली पाडले. त्यामुळे हातभट्टीची वाहतूक करणारा पिकअप व तिला सरंक्षण देणार्या हातभट्टी चालकाची कार पळून गेली. या घटनेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अनिल यादव हे जखमी झाले असून त्यांच्या हाताला मार लागला आहे.
याबाबत दुय्यम निरीक्षक विशाल कदम यांनी ‘पोलीसनामा’ शी बोलताना सांगितले की, मी आणि दुय्यम निरीक्षक अनिल यादव हे चंदननगरमध्ये गस्त घालत होतो. त्यावेळी आम्हाला रात्री खबर मिळाली की बावडी गावातून हातभट्टीची वाहतूक करणारा पिकअप रात्री जाणार आहे. या बातमीनुसार आम्ही बावडी गावात गेलो. तेथील मारुती मंदिराचे मागील चौकात थांबलो. काही वेळाने एक पिकअप येताना दिसला. त्याला थांबविण्यासाठी आम्ही रस्त्याच्या अर्ध्या भागात आमची दुचाकी आडवी घालून पिकअप थांबविला. त्याचवेळी जीवन साठे हा त्याच्या पाठीमागून नवीन मारुती सुझुकी अॅल्टो कार घेऊन आला. त्याने आमच्या दुचाकीला धडक दिल्याने आम्ही खाली पडलो. ही संधी साधून अंधारातून ती दोन्ही वाहने पळून गेली. माझे सहकारी अनिल यादव यांच्या हाताला दुखापत झाली आहे. वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार तपास करीत आहेत.
याबाबत दुय्यम निरीक्षक विशाल कुमार कदम (वय ३०, रा. अष्टविनायक नगर, संघर्ष चौक, चंदननगर) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हातभट्टी चालक जीवन साठे व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वाघोलीजवळील बावडी गावातील मारुती मंदिराचे मागील चौकामध्ये शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातभट्टीची तयार दारु कॅन्डमध्ये घेऊन एक पिकअप व्हॅन जात होती. तिला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोघा दुय्यम निरीक्षकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते खाली पडल्याने दोन्ही गाड्या पळून गेल्या. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.