उरुळी देवाची येथील हांडेवाडी ट्रेड पार्कजवळ असलेली गावठी दारुची हातभट्टी काळे पडळ पोलिसांनी उद्ध्वस्त केली. काळेपडळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, सहायक फौजदार रमेश गरुड व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार दाऊद सय्यद यांना बातमी मिळाली की, उरुळी देवाची येथील हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ गावठी दारु काढण्यासाठी हातभट्टी लावून दारु विक्री करीत आहेत. या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकला. त्यावेळी दारु विक्री करीत असणारा अजित संतोष जयस्वाल याला ताब्यात घेतले. तेथून तयार हातभट्टीच्या दारुने भरलेले एकूण ४४ कॅनमध्ये भरुन ठेवलेली १ हजार ५४० लिटर गावठी दारुचा साठा एकूण ३ लाख ८ हजार ९०० रुपयांचा माल जप्त केला. दारु साठा करण्यासाठी बनविण्यात आलेले पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने उद्धस्त करण्यात आले.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, सहायक फौजदार रमेश गरुड, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, अमोल फडतरे, संजय देसाई, परुशराम पिसे, कांबळे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, शाहिद शेख यांनी केली आहे.