पुणे : धुणी भांडी करणार्या वयोवृद्ध महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नदीपात्रातील वीटभट्टीजवह मारहाण करण्याची धमकी देऊन तिच्या गळ्यातील १ लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्याने जबरदस्तीने चोरुन नेली होती. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी या चोरटयाला चार तासात जेरबंद केले. अक्षय अनिरुद्ध ओक (वय २७, रा. गजानन भवन, पेपर गल्ली, गांधी पेपर समोर, शनिवार पेठ) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याने चोरलेली १ लाख रुपयांची सोनसाखळी व दुचाकी असा १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत दत्तवाडीतील ६५ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या वयोवृद्ध महिला धुणे भांड्यांची कामे करुन शनिवारी सकाळी अकरा वाजता नदीपात्रातून पायी चालल्या होत्या. यावेळी अक्षय ओक याने त्यांना दुचाकीवरुन लिफ्ट दिली. राजपूत वीटभट्टीजवळ आल्यावर त्यांने गाडी थांबविली. या महिलेला मारण्याची धमकी दिली. त्यांना खाली पाडून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तो पळून गेला होता.
या गुन्ह्याची माहिती मिळताच तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळाचे दिशेने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपीचे नाव निष्पन्न केले. शनिवार पेठेतून त्यांनी अक्षय ओक याला पकडले. अक्षय ओक हा पदवीधर असून त्याचा लाँडी व्यवसाय आहे. घरगुती भांडणे आणि आर्थिक कारणावरुन त्याने हा प्रकार केल्याची पोलिसांकडे कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर, महेश शिरसाठ, सागर घाडगे, वसीम सिद्धीकी, रोहित पाथरुट, रोहत मिरजे, नागनाथ म्हस्के यांनी केली