पुणे : जयपूरच्या एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्याने घनिष्ट संबंध निर्माण झालेला डॉक्टर स्कीन उपचारासाठी आला असताना डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणुक केल्यास जास्तीचा परतावा मिळवून देतो, असे सांगून त्याने प्रसिद्ध डॉक्टर व त्यांच्या मित्रांना १ कोटी ७१ लाख १८ हजार १५९ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली. तसेच त्याच्यावर जयपूर येथे खंडणी आणि बलात्काराचे गुन्हे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे याप्रकरणी बाणेर येथील एका ५४ वर्षाच्या डॉक्टरने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन मोहित मुकेश नागर (वय ४१, रा. इंदिरा कॉलनी, बनी पार्क, जयपूर, राजस्थान) या महाठगाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अत्यंत प्रतिष्ठित वैद्यकीय व्यावसायिक आहे. आयव्ही स्किन क्लिनिकचे ते संस्थापक आहेत. त्यांच्या नावावर ६ विविध प्रकारचे पेटंट रजिस्टर्ड आहेत. त्यांची २०१९ मध्ये डॉ. मोहित नागर याच्याशी जयपूर येथे एका मित्रामार्फत ओळख झाली. फिर्यादी यांचे गाव जयपूर असल्याने तिकडे त्यांचे जाणे येणे वारंवार असते. मोहित नागर हे जयपूर येथील एसएमएस मेडिकल कॉलेजमधून पदीव घेतली असल्याने त्यांचे घनिष्ट संबंध निर्माण झाले. डॉ. मोहित नागर याचे वारंवार पुण्याला येणे होत होते. नागर परिवाराला वैद्यकीय मदत लागली तेव्हा त्यांनी मैत्रीपूर्ण संबंधामुळे हक्काने मदत केली. २०२१ – २२ मध्ये मोहित नागर याला स्किन टाईटनिंग (Skin Tigtning) आणि अॅन्टी एजिंग (Anti-Aging) याचा उपचार घेण्यास सांगितले.
त्याप्रमाणे २०२२ ते २०२४ दरम्यान त्यांनी मोहित नागर याच्यावर त्वचेचे विविध उपचार केले. या उपचाराबद्दल उपचार शुल्क सर्व उपचार संपले की देतो, असे त्याने फिर्यादी यांना सांगितले. या उपचारादरम्यान मोहित नागर याने डिजिटल करन्सी व्यवसायमध्ये मी गुंतवणुक करतो़ आणि चांगला परतावा मिळवून देईन, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये १० लाख रुपये डिजिटल करन्सीमध्ये गुंतविण्यास दिले. दहा लाखांचे २० लाख झाले, २० लाखांचे २५ लाख रुपये झाले असे तो उपचारादरम्यान सांगत होता. आणखी काही गुंतवणुक करायची असेल तर सांगा असे तो सांगत होता. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांच्या एका मित्राची ओळख करुन दिली. त्यांचा मित्र जोसेफ याला मोहित नागर याने चांगला परतावा देईन, असे आश्वासन दिले. ते गुंतवणुक करण्यास तयार झाले. त्यांनी नागर याला १ कोटी ४९ लाख ९ हजार १५९ रुपयांची रक्कम गुंतवणुकीसाठी १ सप्टेबर २०२४ पासून पाठविली.
मोहित नागर याचे उपचार पूर्ण झाल्यावर फिर्यादी यांनी संपूर्ण उपचाराचे शुल्क २ लाख रुपयांचे बिल देऊन पैसे मागितले. तेव्हा त्याने ही रक्कम मी डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणुकीसाठी लावली आहे. ती तुम्हाला एकाच वेळेस देतो, असे आश्वासन दिले. मोहित नागर याच्याकडे केलेल्या गुंतवणुकीचा पाठपुरावा व चौकशी करत असताना नागर हा तुम्हाला चांगला परतावा देत आहे, तुम्हाला भरपूर फायदा होईल, थोडे दिवस थांबा, असे सांगून पैसे परत करण्यास टाळाटाळ करु लागला. वारंवार पैसे मागितल्यावर त्याने फिर्यादीला तुझे व तुझ्या मित्राचे पैसे देत नाही़. तुला काय करायचे तू कर, असे बोलून तो शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी देऊ लागला. डॉ. अखिल ची काय हालत केली आहे, ते तुला कळाले असेल व तुझीही तशीच हालत करीन, अशी धमकी त्याने दिली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन करांडे तपास करीत आहेत.