पुणे – शहरातील बिबवेवाडी परिसरातून एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. अपहरणकर्त्यांनी संबंधित व्यापाऱ्याच्या मोबाईलवरून पत्नीला फोन करून २ करोड रुपये तयार ठेवा असे सांगून मोबाईल बंद केला.दरम्यान दोन तास उलटून गेल्यानंतरही फोन न आल्याने पत्नीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या संदर्भात कारवाई करण्यास सुरुवात केली. तिथल शहा असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी पुण्यात संध्याकाळी ज्या दुचाकीवरून ते नवले पुलाजवळ गेले होते त्या ठिकाणाहून त्यांची दुचाकी पोलिसांना आढळून आली. पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणातून मुंबई गाठली. मात्र तरी सुद्धा तिथल शहा तेथे मिळून आले नाही. अखेर तीन दिवसांनी शहा यांनी स्वतः बिबवेवाडी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. तिथल शहा यांनी हे कृत्य आर्थिक नैराश्यामधून केल्याचे आता समोर आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांनी पुण्यातील १० ते १२ लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते व्याजाचे पैसे देणे न झाल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपल्या कुटुंबाला अपहरणाबाबतचा खोटा कॉल केला. त्यानंतर नवले ब्रिज वरून स्वतःचा फोन बंद करून ते रावेत येथे आले. रावेत येथून प्रायव्हेट गाडीने कळंबोली मुंबई गाठली. त्यानंतर बॉम्बे सेंट्रल इथे एक दिवस लॉजवर, खार वेस्ट मुंबई येथील लॉजवर दोन दिवस आणि एक दिवस विलेपार्ले येथे ते राहिले. लोकांनी दिलेल्या त्रासामुळेच मी हा निर्णय घेतल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.