पुणे : वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हेगारांवर झिरो टॉलरन्स धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून गेल्या दीड महिन्यात चार गुन्हेगारांवर एमपीआयडी अंतर्गत कारवाई करुन त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. अभिजित ऊर्फ चौक्या तुकाराम येळवंडे, ओंकार ऊर्फ टेड्या उमेश सातपुते, गौरव संजय शेळके ओंकार ऊर्फ ढेण्या सुधाकर चौधरी यांच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषय गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती कारवाया प्रतिबंधक कायदा (एम पी डी ए) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगार लक्ष्मण ऊर्फ भैय्या येडबा शेंडगे, रोहित वसंत पासलकर, आदितय ऊर्फ बंडी गणेश मंडलीक यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ओंकार ऊर्फ ढेण्या सुधाकर चौधरी हा अल्पवयीन असताना त्याच्या नावावर ४ गुन्हे नोंद झाली होती. तो १८ वर्षाच्या झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यांमध्ये दोन गुन्हे केले. त्याच्यामुळे रामनगर परिसरात कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्याने त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव वारजे पोलिसांनी तयार केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला मान्यता दिली. त्याला २२ फेब्रुवारी रोजी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. यापूर्वीही स्थानबद्ध करणार्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे (Sr PI Vishvajeet Kaigade), पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, सागर कुंभार, योगेश वाघ, निखिल तांगडे, शरद पोळ, गोविंद कपाटे व अमित शेलार यांनी मेहनत घेऊन लोणावळा, धायरी, रामनगर येथून ताब्यात घेऊन त्यांना नागपूर, नाशिक, बुलढाणा येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
यापुढेही गुन्हेगाराविरुद्ध मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. कोणताही गुन्हेगार कायदा हातात घेईल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर देण्याची तयारी वारजे पोलिसांनी ठेवलेली आहे. काही गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे. नागरिकांनी निर्भयपणे व निडरपणे आपले व्यवहार करावेत. कोणीही गुन्हेगार त्यांना त्रास देत असल्यास तातडीने वारजे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे यांनी केले आहे. गुन्हेगारांवर यापुढे झिरो टॉलरन्स धोरण अवलंबत त्यांना कठोरात कठोर शासन कसे होईल व ते गुन्हेगारीतून परावृत कसे होतील, हे पाहण्याकडे कटाक्ष राहणार आहे.
या कारवाईत अपर पोलीस आयुकत प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांचे सहकार्य मिळाले