पुणे :चारित्र्याचा संशय घेत असल्याने पत्नी रागावून मुलासह माहेरी निघून जाते. तेव्हा तिला भेटायला गेलेल्या पतीने दोघांवर धारदार हत्याराने वार केले. त्यात ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला होता. मुलाच्या खुन प्रकरणी वडिलांना जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली योगेश परसराम बसेरे (रा. पठारे वस्ती, कदम वाक वस्ती, ता. हवेली, मुळ रा. अकोला) असे शिक्षा झालेल्या वडिलांचे नाव आहे. ही घटना कदम वाक वस्तीतील पठारे वस्ती येथे १३ जून २०१९ रोजी रात्री अकरा वाजता घडली होती. या घटनेत आयुष योगेश बसेरे (वय ६) याचा खुन झाला होता तर, गौरी ऊर्फ किरण योगेश बसेरे (वय २६) ही गंभीर जखमी झाली होती.
याबाबत गौरीचा भाऊ भारत उत्तम शिरोळे (वय २८) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. योगेश बसेरे हा त्याची पत्नी गौरी हिच्या चारित्र्याचा संशय घेत होता. त्यावरुन त्यांच्यात भांडण झाल्याने जवळच राहणार्या भावाच्या घरी गौरी आपल्याबरोबर दोन मुलांना घेऊन गेली होती. योगेश तिला भेटायला रात्री त्यांच्या घरी आला. दोघा पतीपत्नीत २० मिनिटे बोलाचाली झाली. त्यानंतर योगेश याने खिशातून चाकू काढून गौरीच्या गळ्यावर वार केला. त्यावेळी मध्ये आलेल्या ६ वर्षाच्या आयुष याच्याही गळ्यावर त्याच चाकूने वार केला. फिर्यादी त्या दोघांना वाचविण्यासाठी गेले असताना त्यांच्याही गळ्यावर चाकूने वार केला. त्यानंतर योगेश याने स्वत:च्या हातावर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अती रक्तस्त्राव झाल्याने आयुष याचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फ सहायक सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी ललिता कानवडे यांनी सहाय्य केले. सबळ साक्षीपुराव्याअंती जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी योगेश बसेरे याला जन्मठेप व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे या कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी ललिता कानवडे व तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.